बाकी नेतेमंडळी चार हात दूरच
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधकांचे लक्ष्य झाले असताना राष्ट्रवादीच्या अन्य नेतेमंडळींनी दूर राहणेच पसंत केल्याने अजित पवार यांच्या बचावाकरिता किल्ला लढविण्याची जबाबदारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या खांद्यावर पडली आहे.
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीवरून अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात कामकाजच न झाल्याने सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूचे आमदार अस्वस्थ आहेत. पहिल्या आठवडय़ात अजित पवार यांच्यावर विरोधक तुटून पडले असताना राष्ट्रवादीकडून आर. आर. पाटील हेच किल्ला लढवित होते.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवार यांची बाजू घेण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला.
राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ आणि आर. आर. पाटील हे दोघे मंत्रीच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात पुरे पडू शकतात. अन्य मंत्री किंवा आमदारांमध्ये तेवढे कौशल्य नाही, असे पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले.
यामुळेच आर. आर. पाटील यांना पुढे करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या राजकारणात आर. आर. पाटील हे अलीकडे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात. पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गृहखात्याच्या कारभारावरून नापसंती व्यक्त केली होती.
मात्र अजित पवार यांनी लगेचच आर. आर. पाटील यांची पाठराखण केली होती, याकडे लक्ष वेधण्यात येते.