पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे, डॉ. पद्मसिंह पाटील आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत वाद किंवा आरोप झाले, पण गृहसारखे महत्त्वाचे खाते तब्बल नऊ वर्षे भूषवूनही आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेला अजिबात तडा गेला नाही.
गृह खाते भूषविणारा नेता कोणत्या तरी वादात सापडतो, असा अलीकडचा अनुभव आहे. पण वादापासून आर. आर. दूर राहिले. पोलिसांच्या बदल्या, बढत्या, नियुक्त्यांमध्ये वाद किंवा आरोप होतात, पण या वादापासून ते दूर राहिले. लोकप्रिय घोषणा करण्याची आर. आर. यांना सवय होती, पण गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर कोणताही आरोप झाला नाही किंवा त्यांच्यावर कोणताही ठपका चिकटला नाही. ‘कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू’ किंवा ‘काठीला सोने लावून फिरता येईल अशी कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण करू’ अशा काही त्यांच्या घोषणा वादग्रस्त ठरल्या. त्यावरून टीकाही झाली.
पक्षाची बैठक किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये आर. आर. पाटील सहकार्याचे लक्ष्य होत असत. आर. आर. यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे त्यांचे काही सहकारी त्यांच्यावर राग काढत.
पण आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याची संधी ते सोडत नसत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर खेरवाडीमध्ये सभा आयोजित केली होती. ‘मातोश्री’ निवासस्थान जवळच असल्याने राणे समर्थक आणि शिवसैनिक भिडतील व त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती.
पण काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर दबाव आणून सभेला परवानगी देण्यास भाग पाडले. पोलिसांचा निर्णय फिरिवण्यात आल्याने आर. आर. अस्वस्थ झाले आणि त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. शेवटी शरद पवार यांना आबांची समजूत काढावी लागली होती.