माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचे सोमवारी येथील लीलावती रुग्णालयात निधन झाले. गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून कर्करोगाशी सुरू असलेल्या संघर्षांत राज्याच्या या उमद्या, लोकप्रिय आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याची हार झाली. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी काळाने हिरावून नेलेल्या आबांच्या निधनाचे वृत्त पसरताच राज्यावर शोककळा पसरली. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-तासगाव भागात अनेकांना आबांच्या आठवणींनी शोक अनावर झाला. राज्यात आज, मंगळवारी एक दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे.
तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर गेल्या डिसेंबरात आर. आर. पाटील यांच्यावर येथील ब्रीच कँडी इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत चढउतार सुरू होता. अवघ्या महाराष्ट्राला आबा या घरोब्याच्या नावाने परिचित असलेले रावसाहेब रामराव तथा आर. आर. पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. सांगली जिल्ह्य़ात तासगाव मतदारसंघाचे तब्बल सहा वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केल्याने, या मतदारसंघातील अनेक घरांशी आबांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.
जि.प. सदस्य ते उपमुख्यमंत्री
जिल्हा परिषद सदस्य म्हणून तीन दशकांपूर्वी राजकारणात पदार्पण केलेल्या व राज्याचे ग्रामविकासमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून काम करताना आर. आर. पाटील यांची राज्याच्या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडविण्यातील तळमळ महाराष्ट्राने अनुभवली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या शैलीदार आणि हजरजबाबी वक्तृत्वाची महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमची छाप होती. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची नेमकी नस पकडून त्यानुसार निर्णय घेण्याच्या अचाट क्षमतेमुळे राज्याच्या राजकारणात आबा सतत प्रसिद्धीच्या आणि चर्चेच्या झोतात होते. साहजिकच, राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा अशीही त्यांची ओळख निर्माण झाली होती.

अंजनी शोकसागरात
सांगली : तासगाव तालुक्यातील अंजनी, हजार-बाराशे उंबऱ्यांचे गाव. या खेडय़ात जन्माला आलेल्या आबांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. कोणताही कौटुंबिक राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या कर्तृत्वामुळे राजकारणावर आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या आबांच्या थक्क करणाऱ्या राजकीय प्रवासाचीच चर्चा गावात सर्वत्र झडत होती. राज्याचे नेते म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या मायभूमीची आस कधी सोडली नाही. पद कोणतेही असो आबा गावात आले की, प्रत्येकाची जातीने विचारपूस करायचे. मात्र, आता लोकांमध्ये मिसळणारा हा असामान्य नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

तासगावमध्ये आज अंत्यसंस्कार
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पाíथवावर मंगळवारी तासगाव तालुक्यातील अंजनी या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यासाठी राज्यभरातून महनीय व्यक्तींसह सुमारे दोन ते तीन लाख लोक उपस्थित राहतील.