जेवण झाल्यानंतर किंवा कधीतरी एखाद्या सोहळ्यासाठी आवर्जून काहीतरी गोड पदार्थ खायचा म्हटलं तर साधारण आइस्क्रीमचा क्रमांक वरचा असतो. इतर कोणत्याही गोड पदार्थात भरमसाट पर्याय क्वचितच मिळतात. परंतु, रबडी हा पदार्थ यात अपवाद ठरवणारे बोरिवली पश्चिमेला ‘रबडीवाला’ हे दुकान सध्या अनेकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. रबडीचे विविध प्रकार इथे आहेतच, परंतु मारवाडी आणि गुजराती पदार्थाचीही येथे रेलचेल आहे.

मूळचे जयपूरचे आणि गेली आठ वर्षे मुंबईत असलेल्या अनुराग मुंदडा यांनी  ‘रबडीवाला’चा प्रयोग राबवला आहे. पारंपरिक भारतीय पदार्थाना अधिकाधिक लोकप्रिय करण्याचा त्यांचा उद्देश आहे. गोड पदार्थाचे ‘ब्रॅण्ड’ तयार झाले आहेत. परंतु ‘रबडी’चा चटकन ओठांवर येणारा एकही ब्रॅण्ड नाही. नवीन गोड पदार्थाच्या गर्दीत ती विस्मरणाच्या वाटेवर असल्यासारखे वाटते. म्हणून हा प्रयोग, असे अनुराग विशेष प्रयत्न करीत आहेत. मलई, लच्छा, ड्रायफ्रुट, शाही गुलकंद, चॉकलेट, सीताफळ, मँगो, अंजीर, अंगुरी आणि केसर असे रबडीचे दहा प्रकार येथे मांडलेले आहेत. याशिवाय बिनसाखरेच्या खजूर अंजीर आणि मलाई रबडीही आहेत. यातील प्रत्येक रबडीला दिलेली ट्रीटमेंट वेगळी आहे. मुख्य म्हणजे कुठलाही रंग वा अर्क यात न टाकता ताज्या गोष्टींचाच वापर केला जातो. म्हणजे सीताफळ रबडीत  सीताफळाचा गर वापरला जातो. हे झालं फक्त रबडीविषयी. पण पदार्थाची सरमिसळ केली नाही, तर आपण भारतीय कसले. याच प्रयोगांमधून काही चांगले पदार्थही हाती लागले आहेत. अनुराग यांनीसुद्धा असेच काही प्रयोग रबडीतही केले  आहेत. रबडी हा थंड पदार्थ, पण तो काही गरम पदार्थासोबतही ‘सव्‍‌र्ह’ केला जातो. जिलेबी, गुलाबजामून, शाही तुकडा, घेवर, चोको ल्हावा, चोको पाइ या गरम पदार्थासोबत थंडगार रबडीची मजा येतेच.

वीकेन्ड स्पेशलही काही प्रकार येथे आहेत. पायनॅपल जिलेबी रबडी, मावा जिलेबी रबडी, मालपोवा रबडी अशी चवदार सरमिसळ येथे चाखायला मिळते.

यातील कळस म्हणजे ‘रबडी शेक्स’ हा अनेकांच्या जिभेचे चोचले पुरवतो. दहा प्रकारच्या ‘रबडी शेक्स’ येथे आहेत. कुल्फीसोबत ‘रबडी सव्‍‌र्ह’ केली जाते. अनुराग यांचा सध्या एक महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरू आहे. रूम टेंपरेचरला पाच महिने टिकू शकते अशी डबाबंद केलेली रबडी ते बाजारात आणत आहेत. अशी रबडी बाजारात दाखल करणारे ‘रबडीवाला’ एकमेव आहेत, असा त्यांचा दावा आहे.

राजस्थान म्हटलं की पहिला पदार्थ डोळ्यासमोर येतो तो म्हणजे दाल बाटी चूर्मा. रेग्युलर आणि मसाला दाल बाटी दोन प्रकारच्या चटण्यांसोबत सव्‍‌र्ह केली जाते. दाल बाटी हा हाताने खाण्याचा एक फक्कड पदार्थ आहे. बाटीचा चुरा करून त्यावर दाल, चुर्मा आणि चटण्या टाकून हे सर्व पदार्थ नीट चुरून मगच तो घास तोंडात टाकावा. तरच तुम्हाला त्याचा खरा आस्वाद घेता येईल. सोबतीला ताक नक्की मागवा. एका धारेचं वाटावं इतक्या सफाईदारपणे घुसळलेलं आणि त्यामध्ये मसाल्याचं योग्य प्रमाण यामुळे इथलं ताकही वेगळं ठरतं.

विविध प्रदेशांची खासियत म्हणून थाळी या प्रकाराची सध्या चलती आहे. पण अनलिमिटेड थाळीमध्ये मोठय़ा प्रमाणात अन्न वाया जातं. अनुराग यांना ही गोष्ट अजिबात मान्य नाही. त्यामुळे ‘रबडीवाला’मध्ये मिनी थाळी हा प्रकार आहे. त्याशिवाय मनपसंद थाळीमध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या निवडण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. गट्टे की सब्जी, शेव टोमॅटो, आलू की सब्जी, अख्खे प्याज की सब्जी, बैंगन भरता, पापड की सब्जी या भाज्या मारवाडी आणि काठीयावाडी पद्धतीने तयार केल्या जातात. बाजरे का रोटला आणि भाकरीसोबत त्या खाऊ  शकता. मुंबईतील अनेक रेस्टॉरंटमध्ये चपाती मिळत नाही. मिळाली तरी ती आपल्याला आवडत नाही. पण इथे चपाती अगदी घरी तयार होणाऱ्या चपातीसारखी मिळते. इथले कूक जयपूर, राजकोट, सूरत आणि अहमदाबादचे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणांचे पदार्थ बनविण्याची पारंपरिक पद्धत आणि चवीची त्यांना चांगलीच ओळख आहे.

रबडीवाला

  • कुठे- शॉप क्रमांक ९-१०, मंगल आरंभ, कोरा केंद्र गार्डनसमोर, आर. एम. भट्ट मार्ग, बोरिवली (पश्चिम)
  • कधी- सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२.३० वाजेपर्यत.

nanawareprashant@gmail.com

@nprashant