यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुलुंडमधून तिकीट मिळवण्यासाठी भाजपामध्ये अंतर्गत चुरस आहे. मुलुंडचा विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. जवळपास सहा उमेदवार मुलुंडमधून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. ज्येष्ठ आणि युवा नेते तिकीट मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी होण्यापूर्वी या सर्व इच्छुकांनी मतदारसंघात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. स्वत:चे फलक लावून प्रचार केला. सध्या भाजपाचे सरदार तारा सिंग इथून आमदार आहेत. सरदार तारा सिंग आता ७५ वर्षांचे आहेत. १९९९ पासून सलग चार वेळा निवडणूक जिंकून ते विधानसभेवर गेले आहेत. वयोमानामुळे सरदार तारा सिंग यांना तिकीट मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

तारा सिंग आपला मुलगा रणजित सिंगसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्या दोन दशकांपासून भाजपामध्ये सक्रिय असलेले मिहिर कोटेचा सुद्धा तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. २०१४ साली त्यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी फक्त ८०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

पराभवानंतरही त्यांनी वडाळयामध्ये काम चालू ठेवले. पण तिथले विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोटेचा यांना तिथे संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

मुलुंडमध्ये मोठया प्रमाणावर गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे भाजपाचा उमेदवार इथे सहज विजयी होतो. मिहिर कोटेचा हे मूळचे मुंलुंडचे असून ते गुजराती आहेत. त्यामुळे तिकीटासाठी त्यांचे पारडे जड मानले जात आहे. माजी खासदार किरीट सोमय्या सुद्धा या मतदारसंघातून पत्नी मेधा सोमय्याच्या तिकीटासाठी प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ नेते प्रकाश गंगाधरे हे सुद्धा इथून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.