राधाकृष्ण विखे यांची टीका

उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे राजीनामे फेटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, पत सावरण्यासाठी शिवसेनेने उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक रचल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर प्रकाश मेहतांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देसाईंचा राजीनामा फेटाळल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोन्ही मंत्र्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर देसाई आणि मेहता यांनी आपले राजीनामे देण्याची तयारी दाखविली. मात्र मुख्यंत्र्यांनी त्यांचे राजीनामे फेटाळले. त्यांच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधी पक्षांनी पुराव्यांसह आरोप करून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु त्यास साफ नकार देत यापूर्वीच्या सरकारच्या काळातच गैरव्यवहार झाल्याचे सांगून उद्योगमंत्र्यांनी स्वत:चा केविलवाणा बचाव केला. देसाई यांना त्यांच्या विभागात यापूर्वी गैरव्यवहार झाल्याचे माहिती होते तर तीन र्वष ते झोपले होते का, असा सवाल करून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिवसेनेमध्ये नैतिकता असती तर तातडीने उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. परंतु त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कानावर हात ठेवले आणि आता जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाईंचे समर्थन केल्याबाबत विखे पाटील म्हणाले की, शिवसेना पूर्वीपासूनच भ्रष्टाचाराचे समर्थन करीत आली आहे. त्यामुळे शिवसेनेने  देसाईंची पाठराखण करण्यात काहीच आश्चर्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.