‘आधीच्या सरकारपेक्षा भाजपचे मंत्री अधिक जवळचे वाटतात किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली मैत्री आहे’, अशी विधाने करून खळबळ माजवून देणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी समज दिली. आपण आधीच खुलासा केल्याचे सांगत विखे यांनी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित केली होती. गेल्या आठवडय़ात विखे-पाटील यांनी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप नेत्यांचे गोडवे गायले होते. त्याचे पडसाद या बैठकीत उमटले. विरोधी पक्षनेतेच सत्ताधाऱ्यांचे गुणगान गात असल्यास चुकीचा संदेश बाहेर जातो, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी विखे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही विखे-पाटील यांना ताकीद दिल्याचे सांगण्यात येते. केवळ मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागले म्हणून सरकारचे आभार मानले. यापेक्षा अन्य कोणताही उद्देश नव्हता, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर आता पडदा पडल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला तरी त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. यामुळेच ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ हे अभियान उद्यापासून राज्यभर सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून कर्जमाफी झालेली नाही, असा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. बुलढाण्यात अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या या अभियानाला सुरुवात होईल.

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम हे राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या करप्रणालीतील त्रुटी आणि त्याचे होणारे परिणाम यावर ते आपली मते मांडतील. पुण्यात या अभियानाला सुरुवात होणार आहे.

संत-महंत काँग्रेसबद्दल नापसंती

गेल्या आठवडय़ात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी संत-महंत काँग्रेसचे आयोजन केले होते. याबद्दल हुसेन दलवाई आणि नसिम खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अल्पसंख्याकांवर हल्ले होत असताना त्या विरोधात काहीच आवाज उठविला जात नाही किंवा संत-महंत संमेलने भरवून कोणता संदेश दिला जातो, असा सवालही उपस्थित करण्यात आला.