विखे-पाटील यांचा दावा; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी चर्चा

कर्नाटक दहशतवादी विरोधी पथकाने जमा केलेल्या माहितीमुळेच महाराष्ट्र पोलिसांना कट्टरवाद्यांच्या विरोधात कारवाई करावी लागली आहे. अन्यथा भाजप-शिवसेना सरकारने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासांसह सनातन संस्थेच्या विरोधात डोळेझाक केली होती, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या चौकशीत कर्नाटक दहशतवादी विरोधी पथकाला महाराष्ट्रातील कट्टरवाद्यांच्या कारवायांचा सुगावा लागला होता. ही माहिती कर्नाटक पोलिसांनी राज्य पोलिसांना दिली होती. यानुसारच कारवाई करण्यात आल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. राज्यातील कट्टरवाद्यांच्या कारवायांच्या संदर्भात माहिती घेण्याकरिता विखे-पाटील यांनी बंगळूरुमध्ये जाऊन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री परमेश्वरन यांची भेट घेतली. या भेटीत परमेश्वरन यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कर्नाटक दहशतवादी विरोधी पथकाने राज्य पोलिसांना माहिती देण्यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी चौकशीत फार काही प्रगती झालेली नसल्याचा अहवाल राज्य सरकारने सादर केला होता. कर्नाटक पोलिसांनी छडा लावताच आरोपींना अटक करण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळेच राज्यातील दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्यांचे बिंग फुटल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला.

सनातन संस्थेच्या विरोधात बंदीबाबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून सरकारच्या उदासीन मानसिकता स्पष्ट होते, अशी टीकाही विखे-पाटील यांनी केली.