‘सामना’तील वादग्रस्त व्यंगचित्रावरून उद्धव ठाकरेंनी मागितलेली माफी हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात मराठा मोर्चासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे माफी मागितली. उद्धव यांच्या या माफीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून माफी मागितलेली नाही. मराठा समाजाच्या असंतोषामुळे त्यांना माफी मागणे भाग पडले. उद्धव ठाकरेंना मनापासून माफी मागायची असती, तर व्यंगचित्र छापून आल्यानंतर लगेच माफी मागितली असती, मराठा समाजातील कार्यकर्ते दसरा मेळाव्याकडे पाठ फिरवतील म्हणून उद्धव यांनी माफी मागितल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. उद्धव यांनी पत्रकार परिषदेत व्यंगचित्राच्या माध्यमातून आमचा मराठा समाजाच्या भावना दुखाविण्याचा किंवा माता-भगिनींचा अपमान करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, तरीदेखील कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आणि ‘सामना’चा संपादक म्हणून मी माफी मागतो, असे उद्धव यांनी सांगितले. उद्धव यांच्या माफीनंतर काही दिवसांपूर्वी सामनाच्या कार्यालयांवर हल्ला करणाऱ्या संभाजी ब्रिगेडकडूनही व्यंगचित्राच्या वादावर पडदा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. व्यंगचित्रावरुन संतापाच्या प्रतिक्रिया या जनभावना होत्या. उद्धव ठाकरेंच्या माफीनंतर आता वाद संपला आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांनी व्यक्त केली.