कॉंग्रेसने विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी सोमवारी राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड केली. त्याचबरोबर उपनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.
विधानसभेतील गटनेतेपदासाठी नगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात चुरस होती. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेतील गटनेतेपद मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना विरोध करीत थोरात यांच्या पारड्यात आपले मत टाकले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. थोरात काहीसे मवाळ प्रवृत्तीचे असल्यामुळे सभागृहात जनतेचे प्रश्न ते आक्रमकपणे मांडू शकतील का, याबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये साशंकता होती. त्या दृष्टीनेही राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड करण्यात आल्याचे समजते.