स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँ यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. राधे माँचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपांप्रकरणी राधे माँ यांना तूर्ततरी अटक करता येणार नाही.
राधे माँ यांच्या आणि तक्रारदार महिलेच्या वकिलांकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी जामीन मंजूर केला. कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीसांकडून सांगितले जाईल, त्यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची अट जामीन देताना घालण्यात आली आहे. त्याचबरोबर तपासात पोलीसांना सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या प्रकरणी १४ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने राधे माँ यांना तात्पुरता दिलासा देत अतरिम जामीन मंजूर केला होता. तत्पूर्वी कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.