आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना याआधी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता पद्मविभूषण पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ.रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य केले आहे.
डॉ. माशेलकर यांना पन्नासहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मभूषण, पद्मश्री तसेच शांतीस्वरूप भटनागर मेडल, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अॅवॉर्ड हे त्यांपैकी काही होत. तसेच लंडन येथील जगद्विख्यात रॉयल सोसायटी लंडनची फेलोशिपही त्यांना १९९८ मध्ये मिळाली.
अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. आजही ते कष्ट करण्याची क्षमता, शिस्त, बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, नेतृत्वगुण व प्रखर देशनिष्ठा या आपल्या गुणांसह- विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.