लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फटका बसला असला तरी सत्ताधारी भाजप सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवा तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आतापासूनच सज्ज राहा, असा आदेश काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी नांदेडमध्ये दिला.
तेलंगणामधील पदयात्रा संपवून नवी दिल्लीत परतण्याकरिता राहुल गांधी नांदेडमध्ये आले होते. तेव्हा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. पक्ष संघटना वाढीसाठी पक्षाने कोणते उपाय योजले आहेत याची माहिती चव्हाण यांनी गांधी यांना दिली. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्यतो राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची नाही, या प्रदेश काँग्रेसची भूमिकेची माहिती चव्हाण यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाने सुरू केलेल्या तयारीबाबतही चव्हाण यांनी चर्चा केली. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याची सूचना गांधी यांनी केली.
 राहुल गांधी जून महिन्यात मराठवाडय़ाला भेट देण्याची शक्यता आहे.

तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

आदिलाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बडय़ा भांडवलदारांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे केला. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गरिबांचा विसर पडला असून ते मिनी मोदी आहेत, अशी टीकाही गांधी यांनी केली. राज्यात राहुल यांनी पदयात्रा काढली. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला.

(छायाचित्र: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पदयात्रेदरम्यान तेलंगणमधील आदिलाबाद जिल्ह्य़ातील निर्मल येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
)