शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगपती राहुल बजाज यांच्या सदिच्छा

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारे आणि अहोरात्र सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणारे शरद पवार हे असामान्य नेते असल्याचे ‘रिलायन्स’ उद्योगसमुहाचे मुकेश अंबानी यांचे गौरवोद्गार, आता राष्ट्रपती व्हा, असा राहुल बजाज यांचा प्रेमळ सल्ला तर राज्यात कोणतीही घटना घडल्यावर त्याच्या मागे पवार असतात ही चर्चा होण्यामागचे न सुटलेले कोडे, हा राज ठाकरे यांचा मिश्कील सवाल. ७५ पूर्ण झाली, आता शतक गाठा या सर्वांच्या शुभेच्छांनी पवारांचा वाढदिवस शनिवारी साजरा झाला.
दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत पवारांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला होता. आज वाढदिवसाचे निमित्त साधून वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला राज्यातील राजकारणी, उद्योगपती, क्रीडा, कला, साहित्य क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली. ‘आधारवड’ या पवारांवरील पाच भाषांमधील पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते करण्यात आले. राजकारण, समाजकारण, क्रीडा, कला, शेती यासह विविध क्षेत्रांमध्ये एकच नाव सातत्याने आघाडीवर राहिले व ते म्हणजे शरद पवार. पवारांना हे कसे काय जमले हा प्रश्न साऱ्याच वक्त्यांनी केला. पवार ही अद्भूत शक्ती असल्याचे सांगतानाच राज ठाकरे यांनी, तेल लावलेला पैलवान त्यांना का म्हणतात याचा प्रत्यय आला आहे. कर्करोगासारखा दुर्धर आजाराच्या हातात ते सापडले नाहीत याचा उल्लेख त्यांनी केला. अविश्रांत मेहनत घेण्याचा त्यांचा गुण उल्लेखनीय आहे. ते जागे असले की शत्रूंबरोबरच मित्रांचीही झोप उडवितात, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच १२ तारीख आणि १२व्या महिन्यातील त्यांचा जन्म असल्याने त्यांनी अनेकांचा बारा वाजविल्याचा मार्मिक टोलाही उद्धव यांनी लगावला.
‘करंगळी पकडून शरद पवार यांनी मला राजकारणात आणले व देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत पदे भूषविण्याचा मान मिळाला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असली तरी त्यांच्यातील सच्चा काँग्रेसजन लुप्त होणार नाही, असे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
शरद पवार यांच्य रुपाने देशाला उत्तम पंतप्रधान मिळाला नाही ही खंत कायम असली तरी त्यांनी आता राष्ट्रपती व्हावे, असा सल्वा उद्योगपती राहुल बजाज यांनी दिला. राज्यपाल सी. विद्यासागर राव, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, नारायण राणे, मनोहर जोशी, नाना पाटेकर आदींची भाषणे झाली.