मुंबई दौऱ्यावर आलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सह्य़ाद्री अतिथिगृह नाकारण्यात आल्यावरून काँग्रेस आणि राज्य सरकार यांनी उलटसुलट दावे केले आहेत. गांधी यांना सह्य़ाद्री अतिथिगृहावर राहण्यास सरकारने परवानगी दिली नसल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचा राज्य सरकारने मात्र इन्कार केला आहे. गांधी यांच्यासाठी सह्य़ाद्री अतिथिगृहात एक कक्ष आरक्षित ठेवण्यात आला होता असा दावा सरकारने केला आहे.
विशेष सुरक्षा पथकाची (एसपीजी) सुरक्षा व्यवस्था असल्याने राहुल गांधी यांना राज्य सरकारच्या ‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहात वास्तव्य करण्याची परवानगी मिळावी म्हणून काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारला पत्र देण्यात आले होते. पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने गांधी यांची व्यवस्था अन्यत्र करावी लागल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.
मात्र १४ जानेवारी रोजी काँग्रेसचे पत्र मिळाल्यांनंतर राजशिष्टाचार विभागाकडून राहुल गांधी यांच्यासाठी एक कक्ष आरक्षित करण्यात आला होता, असे सांगत सरकारने काँग्रेसचा दावा फेटाळून लावला आहे.