लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. विशेष म्हणजे, गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गाधींना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली होती. तरीही राहुल यांनी न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आणि नियोजित वेळेनुसार सकाळी ११ वाजता राहुल गांधी भिवंडी न्यायालयात दाखल झाले.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला उपस्थित न राहण्याचा दिलासा जरी दिला असला तरी न्यायव्यवस्थेचा मी आदर करतो. सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे वचन मी न्यायालयाला दिले होते. त्यामुळे मी जे वचन देतो ते पूर्ण सुद्धा करतो म्हणूनच भिवंडी न्यायालयात सुनावणीवेळी हजर झाल्याचे म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टोला हाणला. राहुल यांच्या विरोधातील या खटल्याची पुढील सुनावणी आता ११ जुलै रोजी होणार आहे.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयाच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी भिवंडीतील न्यायालयात हजर व्हायचे होते. मात्र, राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयातील खटल्याच्या सुनावणीला राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याची कोणतीही गरज नसल्याचे स्पष्ट केले होते.
लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान, राहुल यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. संघाकडून सादर करण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या तपासणीनंतर भिवंडी न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. राहुल गांधी यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना याप्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला होता.