mp10काँग्रेसमध्ये सध्या सोनियानिष्ठ आणि राहुलनिष्ठांमध्ये जोरदार जुंपली असून, पक्षाची सारी सूत्रे हातात घेण्याच्या उद्देशाने राहुलनिष्ठांनी जुन्या नेत्यांना दूर करण्याचा चंग बांधला आहे. सोनियांचे निकटवर्तीय अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी आदी नेते राहुलनिष्ठांना खुपत असल्याचे सांगण्यात येते.
सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे जनार्दन द्विवेदी यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले. या संतापातच त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाच्या संघटनेत महत्त्वाचे नेते मानले जातात. सोनिया या पटेल यांच्या सल्ल्याने अनेकदा निर्णय घेतात. अहमद पटेल यांचे वाढते प्रस्थ राहुलनिष्ठांना सहन होत नाही. जयराम रमेश, सी. पी. जोशी, मोहन प्रकाश, जितेंद्र सिंग आदी नेते हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. अजिबात जनाधार नसलेले नेते राहुल यांच्या कंपुत आहेत. यामध्ये काही माहिती तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. जनतेची नाडी ओळखण्याची या मंडळींमध्ये अजिबात कुवत नसल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जाते.
पक्षाच्या जुन्या रचनेत बदल करण्यावर राहुल गांधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा प्रयत्न आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये बदल करण्याचे घाटत होते. पण जुन्या नेत्यांनी राहुल गांधी यांची योजना हाणून पाडली. याचाही राग राहुल यांना असल्याचे सांगण्यात येते. काही जुने नेते मुद्दामहून राहुल गांधी यांच्या योजनांवर पाणी फिरविण्याचे काम करतात आणि त्याला अहमद पटेल यांची साथ असल्याचा राहुल यांच्या निकटवर्तीयांचा संशय आहे.
राहुल गांधी यांच्या सहमतीने नियुक्त झालेल्या काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना विरोध सुरू झाला आहे. पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करीत माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांची नाराजी दूर न झाल्यास सिंग हे पक्ष सोडण्याची शक्यता आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्णयाला पक्षातून आव्हान दिले जात नसे. पण राहुल यांच्या निर्णयांना पक्षातून विरोध सुरू झाला आहे. यामागे सोनियानिष्ठ असल्याने राहुल यांचा कंपू नाराज आहे.