तब्बल ५६ दिवसांच्या सुट्टीवरून पतरल्यावर संसदेत आक्रमक झालेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता पदयात्रेच्या माध्यमातून थेट लोकांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी विदर्भापासून होत असून, गेल्या वर्षी निवडणुकीत ढासळलेला एकेकाळचा काँग्रेसचा गड पुन्हा काबीज करण्याकरिताच राहुल यांनी विदर्भातून पदयात्रेचा प्रारंभ केल्याची चर्चा आहे.
सुट्टीवरून परतल्यानंतर राहुल गांधी जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधत आहेत. या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात करण्याकरिता महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. त्यातही काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघातील गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. धामणगावचे काँग्रेस आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मतदारसंघात गुरुवारी ते  जवळपास १५ कि.मी. पायी प्रवास करणार आहेत. या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या व्यथा ऐकण्यासाठी धामणगाव आणि चांदूर रेल्वे या तालुक्यांमधील गावांना राहुल गांधी भेट देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषेदत दिली. या वेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे उपस्थित होते. एकूण १७५ कि.मी. अंतरातील गावांचा दौरा करताना १५ कि.मी. पायी तर उर्वरित प्रवास गाडीने करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या या परिसरात झाल्यानेच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदारसंघातील गावांमध्ये गांधी पदयात्रा काढणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. गेल्या जानेवारीपासून राज्यात ६००पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात विदर्भातील २९५ तर मराठवाडय़ातील २१५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
 केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अजिबात गंभीर नाहीत, असा आरोप चव्हाण यांनी केला. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या, पण तेव्हा कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला होता. आताही कर्जमाफीची आवश्यकता आहे. पण सरकार शेतकऱ्यांच्या हाती किडुकमिडुक मदत देत आहे.
साठा करण्याची मर्यादा काढण्यात आल्याने उडिद, मूग, तूर आणि चणाडाळ यांच्या किंमती मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. काही मोजक्या बडय़ा व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.  
विदर्भाकडे जास्त लक्ष
१० खासदार आणि ६२ आमदार निवडून देणाऱ्या विदर्भाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली. अगदी जनता लाटेतही विदर्भ काँग्रेसच्या मागे उभा राहिला होता. पण गेल्या वर्षी निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. एकही खासदार निवडून आला नाही, तर विधानसभेत दुहेरी आकडा गाठणे काँग्रेसला शक्य झाले नाही. ही परिस्थिती बदलावी म्हणून राहुल यांच्या देशव्यापी उपक्रमाचा प्रारंभ करण्यासाठी विदर्भाची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे