पराभवावर काँग्रेस कार्यकारिणीत आज विचारमंथन

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली असून शनिवारी होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, हा प्रस्ताव फेटाळून राहुल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला जाण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधील राज्य सरकारे टिकवण्याच्या आव्हानांवरही चर्चा केली जाणार आहे.

राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सातत्याने अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राजबब्बर, अमेठीचे जिल्हाप्रमुख तसेच कर्नाट प्रचार व्यवस्थापक, ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष आदींनी राजीनामे दिले आहेत. या सर्व मुद्दय़ांवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाऊ शकते.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी गुरुवारी राहुल यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर राहुल यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. हा प्रश्न मी आणि कार्यकारिणी यांच्यातील असल्याचे स्पष्टीकरण राहुल यांनी दिले होते. पक्ष प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी राजीनाम्याच्या प्रस्तावाचा इन्कार केलेला कर्नाटकमधील आघाडी सरकार तसेच, मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात असल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी भाजपने राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसची राज्य सरकारे वाचवण्याचेही आव्हान पक्षासमोर आहे.

१६ वी लोकसभा भंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेऊन मंत्रिपरिषदेतील मंत्र्यांसह पंतप्रधानपदाचा राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी प्रथेप्रमाणे मोदी यांना काळजीवाहू मंत्रिमंडळाचा कारभार पाहण्याची विनंती केली. त्याधी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक झाली. त्यात १६ वी लोकसभा विसर्जित करण्याचा ठराव संमत करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

‘एनडीए’चीही आज बैठक

लोकसभा मतदारसंघनिहाय अधिकृत निकाल शुक्रवारी जाहीर झाले असल्याने भाजप आणि घटक पक्षांचे खासदार शनिवारी दिल्लीत येतील. भाजपच्या संसदीय पक्षाची तसेच, ‘एनडीए’ची बैठकही शनिवारी होणार आहे. या दोन्ही बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापनेचा प्रस्ताव संमत केला जाईल. ‘एनडीए’ची बैठक भाजप आणि घटक पक्षांतील समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाची असेल. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदी यांच्या नेतृत्वावर प्रस्तावाद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.