एप्रिल, जुलै मग सप्टेंबर, राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आतापर्यंत मुहुर्त जाहीर झाले. सप्टेंबरमध्ये पक्षाच्या अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार अशीही चर्चा होती, पण आता हा मुहुर्तही लांबणीवर टाकण्यात आला आहे. बिहार निवडणुकीनंतरच बहुधा मुहुर्त ठरविला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्याची योजना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी तयार केली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची मान्यताही घेण्यात आली. चालू वर्षांच्या सुरुवातीला राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड केली जाईल, असे सांगण्यात येत होते. पण संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात राहुल गांधी जवळपास दोन महिन्यांच्या सुट्टीवर गेले. सुट्टीवरून परतल्यावर जुलैचा मुहुर्त सांगण्यात येत होता. मग सप्टेंबरमध्ये अ. भा. काँग्रेस समितीच्या अधिवेशनात ही निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. आता सप्टेंबरचा मुहुर्तही लांबणीवर पडला आहे.
ऑक्टोबरच्या अखेरीस बिहार विधानसभेची निवडणूक आहे. बिहारमध्ये काँग्रेस ताकद नगण्य आहे. नितीशकुमार व लालूप्रसाद यांची युती कायम राहिली तर काँग्रेसला पाच ते सातपेक्षा जास्त जागाही वाटय़ास येणार नाहीत. सप्टेंबरमध्ये राहुल यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि बिहारमध्ये निकाल विरोधात गेल्यास पुन्हा टीका सुरू होणार. हे सारे टाळण्याकरिता डिसेंबर अथवा पुढील वर्षांच्या सुरुवातीला काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे राहुल यांच्याकडे सोपविली जातील, अशी शक्यता आहे. पक्षाच्या उच्चपदस्थांकडून त्याला दुजोरा देण्यात आला.
पुढील वर्षांच्या जूनपर्यंत पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामीळनाडू व पॉण्डेचारी या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. केरळ आणि आसाममध्ये काँग्रेसला सत्ता राखणे सोपे नाही. या पाश्र्वभूमीवर राहुल यांच्या अध्यक्षपदाकरिता आणखी किती काळ प्रतीक्षा केली जाते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी राहुल यांनी अधिक आक्रमक व्हावे, असा सल्ला काही ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे. संसदेत मोठी भाषणे करून आपली छाप पाडावी, असाही सल्ला देण्यात आला आहे.