दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल असलेले संशयाचे वातावरण किंवा पवार यांच्या मनात राहुल गांधी यांच्याबद्दल असलेली अढी या पाश्र्वभूमीवर अलीकडेच राहुल यांनी पवार यांची भेट घेतली. उभयतांतील विसंवाद दूर करण्याच्या उद्देशानेच ही भेट झाल्याचे समजते.
राहुल यांची काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीकाटिप्पणी करण्याची संधी सोडली नव्हती. तर राहुल गांधी यांच्या मनात पवार यांच्याबद्दल नेहमीच संशयाची भावना राहिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस संघटना वाढवायची असल्यास राष्ट्रवादीला नामोहरम करावे लागेल ही पक्की खूणगाठ राहुल गांधी यांनी बांधली आहे. यातूनच मुख्यमंत्री चव्हाण यांनी राष्ट्रवादीला अडचणीत आणल्याचे बोलले जाते.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही उभयतांची गरज लागणार आहे. देशभर काँग्रेसविरोधात वातावरण असून, त्याचा फटका आघाडीतील भागीदार म्हणून राष्ट्रवादीलाही बसत आहे. त्यातच राज्यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विविध प्रतापांमुळे राष्ट्रवादी अडचणीत आहे. या पाश्र्वभूमीवर नवी दिल्लीत या नेत्यांमध्ये अलीकडेच झालेली चर्चा महत्त्वाची ठरते. या दोघांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राहुल यांच्याशी चर्चा केली. या भेटीला पटेल यांनी दुजोरा दिला.
मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
मनसेने युतीला साथ दिल्यास मुंबई- ठाण्यातील जागांचे गणित बदलण्याची शक्यता आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेता मनसेचे नेते राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज ठाकरे हे शेवटच्या टप्प्यात युतीबरोबर जातील, असा एक मतप्रवाह असला तरी हे होऊ नये, असे आघाडीचे प्रयत्न असल्याचे बोलले जाते.