मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यात अजुनही नाराजी कायम असून ती संपण्याची चिन्हे दिसत नाही. मात्र, शिवसेना वारंवार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करताना दिसत आहे. गुजरातमध्ये भलेही काँग्रेस पक्ष विजयी झाला नसला तरी त्यांच्या चांगल्या कामगिरीची दखल घेतली गेली आहे. यावरुन राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील एक सक्षम विरोधी पक्ष समोर येत असेल तर शिवसेना याचे स्वागतच करेन असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर राहुल गांधींच्या सकारात्मक नेतृत्वाची दखल विरोधीपक्षही घेत असल्याचे सांगत काँग्रेसने शिवसेनेच्या भुमिकेचे स्वागत केले आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रात कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या साप्ताहिक स्तंभातून राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पप्पू म्हणून ज्यांची टर उडवली जात होती त्याच राहुल गांधी यांनी यशाला सत्तेशी जोडणे आणि त्याला खरेदी करण्याच्या धारणेला सुरुंग लावला. गुजरातची निवडणूक ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातच होती. यात राहुल गांधींनी भाजपा आणि पंतप्रधानांना घाम गाळण्यासाठी भाग पाडले होते.

राहुल गांधी यांनी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांना देखील यातून उत्तर दिले होते. राहुल गांधींनी काँग्रेसला पडझडीच्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे. उत्तर प्रदेशात यश मिळवण्यासाठी काँग्रेसने समाजवादी पार्टीसोबत हात मिळवणी केली होती. तेथे त्यांना यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांना मुर्ख आणि अयश्वस्वी मानले जात होते. मात्र, गुजरातच्या निवडणुकांनी त्यांच्यावरील हा शिक्का पुसून टाकला आहे.

यावेळी संजय राऊत यांनी अमित शहांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भाजप जर १५०पेक्षा कमी जागा जिंकत असेल तर त्यांनी जल्लोष करण्याचे कारण नाही. भाजपला या निवडणूकीत शंभरपेक्षा कमी जागा मिळाल्या ही बाब हेच दर्शवते की, राहुल गांधी त्यांच्यासाठी २०१९च्या निवडणुकांसाठी आव्हान म्हणून समोर असतील.