News Flash

घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत तफावत – राहुल गांधी

अवघ्या २० मिनिटांमध्ये १३२ हेक्टर जागेत व्यापलेल्या कचराभूमीचा दौरा आटोपला.

  राहुल गांधी यांची मंगळवारी जव्हेरी बाजारात सभा झाली.  

‘स्वच्छ भारत अभियाना’बाबत राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केली आहे. मात्र मुंबईमधील परिस्थिती पाहिल्यानंतर पंतप्रधानांची स्वच्छतेची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याच प्रचंड तफावत असल्यानंतर स्पष्ट होते, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी हाणला.

सध्या कळीचा मुद्दा बनलेल्या मुंबईमधील देवनार कचराभूमीची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी मंगळवारी मुंबईत दाखल झाले होते. राहुल गांधी ११ वाजता कचराभूमीत येणार असल्यामुळे काँग्रेस कार्यकत्यांनी या परिसरात प्रचंड गर्दी केली होती. राहुल गांधी १२.२५ मिनिटांनी देवनार कचराभूमीत दाखल झाले. कचराभूमीमुळे होणाऱ्या त्रासाची चेंबूरमधील रहिवाशांनी त्यांना माहिती दिली. कचराभूमीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. पण कचराभूमीतील परिस्थिती पाहिल्यानंतर येथे ‘स्वच्छ भारत अभियाना’ची अंमलबजावणी होताना दिसत नाही. घोषणा आणि अंमलबजावणी यात तफावतच दिसून येते. त्यामुळे रहिवाशांना प्रदूषणाचा सामना करावा लागतो आणि अस्थमासारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे.

मुंबई हा देशाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे अशी कचराभूमी मुंबईत असायलाच नको होती. ही कचराभूमी बंद करण्याबाबत कोणतीही दूरदृष्टीच नाही, असाही टोला राहुल यांनी  भाजप-सेना सरकारला हाणला.पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर टाळून राहुल गांधी निघून गेले. अवघ्या २० मिनिटांमध्ये १३२ हेक्टर जागेत व्यापलेल्या कचराभूमीचा दौरा आटोपला.

जवाहिऱ्यांचा थेट उल्लेख राहुल गांधींनी टाळला

शेतकरी, छोटे व्यापारी किंवा कमकुवत गटांना दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट जवाहिऱ्यांचा उल्लेख मात्र टाळला. देशातील सर्व घटकांमध्ये समन्वय साधण्याचे केंद्र सरकारचे काम असते, पण सर्व घटकांमध्ये समन्वय साधण्यात सरकारला अपयश आल्याची टीकाही त्यांनी केली.

एक टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या जवाहिरे आणि कारागिरांना पाठिंबा दर्शविण्याकरिता राहुल गांधी यांची जव्हेरी बाजारात सभा आयोजित करण्यात आली होती. अशोक चव्हाण, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांच्यासह जवाहिरांच्या संघटनेचे इंदरकुमार जैन आणि सिंघवी हे उपस्थित होते. अबकारी कराचा बोजा लादून छोटे व्यापारी आणि कामगारांना संपविण्याचा  केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. फक्त जवाहिऱ्यांची बाजू घेतल्यास त्याची उलटी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असल्यानेच राहुल गांधी यांनी आठ मिनिटांच्या भाषणात एकदाही जवाहिऱ्यांचे आंदोलन, असा उल्लेख केला नाही. छोटे व्यापारी आणि कामगार असाच उल्लेख त्यांनी केला. सरकारने समन्वयाची भूमिका साधताना न्यायाधीशाची भूमिका वठवायची असते, पण मोदी सरकार वकिलाची भूमिका बजावीत आहे, अशी टीका त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2016 4:12 am

Web Title: rahul gandhi slams narendra modi over swachch bharat
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 अशोक चव्हाणांच्या नियुक्तीनंतर वर्षभराने कार्यकारिणी जाहीर
2 डान्स बार सुरू होणे कठीणच!
3 अनधिकृत बांधकामप्रकरणी ‘मोक्का’सारखी कारवाई – मुख्यमंत्र्यांची घोषणा
Just Now!
X