मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहे. जनतेचा पैसा उकळून श्रीमंतांचे कर्ज माफ केले जात आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.

भारताचे संविधान, संस्थांवर आक्रमण करणाऱ्या भाजपा, आरएसएसविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकवटत आहेत. ही फक्त राजकारण्यांची नाही तर जनतेचीही भावना आहे असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. ‘जे छोटे व्यवसायिक आहेत ते दुखी आहेत. हे सरकार देशातील जे सर्वात श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी काम करत आहे. त्यांचं लाखो, करोडोंचं कर्ज माफ करण्यात आलं. छोट्या व्यवसायावंर आक्रमण केले जात आहे’, असा आरोप राहुल गांधींनी केला.

तसंच कच्चं तेल स्वस्त असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत आहेत ? असा सवाल राहुल गांधींनी यावेळी विचारला. तसंच पेट्रोल – डिझेल जीएसटीत आणण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या प्रकारे मोदी आक्रमण करत आहेत ते थांबवण्याची गरज आहे असंही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे.