संपकरी सराफ आणि देवनारला भेट देणार
अबकारी कराच्या विरोधात गेले ४० दिवस संपावर असलेल्या जवाहिऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी, तसेच सातत्याने आगींमुळे चर्चेत आलेल्या देवनार कचराभूमीला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे मंगळवारी भेट देणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उपस्थित राहिल्यावर राहुल गांधी हे मंगळवारी मुंबईला भेट देणार आहेत. सतत लागणाऱ्या आगींमुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेल्या देवनार कचराभूमीला राहुल गांधी सकाळी भेट देतील. त्यानंतर जव्हेरी बाजारात संपकरी सराफांची ते भेट घेणार आहेत.
यापूर्वी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आयोजित करण्यात आलेल्या जवाहिऱ्यांच्या आंदोलनाला राहुल यांनी भेट दिली होती. आता मुंबईत संपावर असलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जवाहिऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप तर देवनार कचराभूमीवरून महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला राहुल लक्ष्य करणार आहेत.