संघाबद्दल वक्तव्यप्रकरणी अब्रुनुकसानीच्या खटल्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाने ८ मेपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. राहुल यांच्या वकिलांनी हजर राहण्याचे मान्य केले. महात्मा गांधी यांचा मारेकरी संघाचा सदस्य होता असे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी ६ मार्च रोजी सोनाले येथील जाहीर सभेत केले होते. त्यावरून संघाचे स्थानिक नेते राजेश कुंटे यांनी तक्रार दाखल केली होती. सध्या राहुल कोठे आहेत याची चर्चा सुरू आहे. कुंटे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश राहुल यांना न्यायालयाने दिले होते. खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्यापासून सवलत मिळावी तसेच तक्रार रद्दबातल ठरवावी, असे राहुल यांच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. मात्र न्यायालयाने गेल्या महिन्यात त्यांची मागणी फेटाळून लावत, राहुल यांचा उद्देश संघाची प्रतिमा मलिन करण्याचा होता असे निरीक्षण नोंदवले होते.