निवडणूक म्हटल्यावर दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयासमोर तिकीट इच्छुकांची होणारी गर्दी, पक्षाच्या वॉररुममध्ये दररोज घेतला जाणारा आढावा, कोठे कमी पडतो, कोठे दुरुस्ती करायला पाहिजे यावर होणारा काथ्याकूट हे चित्र बिहार निवडणुकीच्या तोंडावर बघायला मिळत नाही. पक्षाच्या पातळीवर निरव शांतता असून, जे काही होईल ते रामभरोसे असाच सूर आहे.
काँग्रेसमध्ये सध्या सोनियानिष्ठ आणि राहुलनिष्ठ अशी उघड फूट पडली आहे. पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधी यांची फेरनिवड झाल्याने राहुल काहीसे नाराज असल्याचे समजते. यामुळेच बिहार निवडणुकीच्या तयारीत राहुल यांचे निकटवर्तीय अद्याप तरी फार सक्रिय झालेले नाहीत. कोणत्याही निवडणुकीसाठी पक्षाच्या वॉररुममध्ये जोरदार हालचाली सुरू असतात. पण बिहार निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान दोन आठवडय़ांवर आले तरी पक्षात फार काही उत्साह दिसत नाही. कोणत्या मतदारसंघात कोणते डावपेच आखायचे, प्रचाराचे नियोजन या आघाडीवर धामधूम दिसत नाही.
नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर आघाडीत काँग्रेस लढत असली तरी दोन्ही पक्षांनी काँग्रेसला दुय्यम स्थान दिले आहे. कलंकित लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्याचा वटहुकूम फाडमून टाकावा, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याने लालूप्रसाद यादव यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली. यामुळेच लालूप्रसाद यादव हे राहुल गांधी यांच्यावर संतप्त आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकविण्याची संधी लालू सोडणार नाहीत. काँग्रेसमधील जुन्याजाणते नेतेही बिहारमध्ये यश मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले असणार. बिहारमध्ये काँग्रेसला यश मिळाले आणि भाजपचा पराभव झाल्यास लगेचच राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा होईल. जुन्या नेत्यांना पक्षात फार काही महत्त्व देण्यास राहुल यांचा विरोध आहे. यामुळेच आपले महत्त्व कमी होईल, अशी भीती या नेत्यांना आहे.