कचराभूमीचा दौरा २० मिनिटांत समाप्त; भाषणासाठी ताटकळलेल्या कार्यकर्त्यांची निराशा
अवघ्या मुंबईचा कचरा सामावून घेत असल्यामुळे जातायेता भल्याभल्यांना ‘नाक मुठीत’ धरायला लावणाऱ्या देवनारच्या कचराभूमीवर मंगळवारी मात्र, एखाद्या आयपीएल सामन्यासाठी जमलेल्या गर्दीसारखी गर्दी होती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचा मुद्दा बनलेल्या देवनार कचराभूमीवर वारंवार लागणाऱ्या आगी आणि येथील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न याची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येणार असल्याने त्यांना पाहण्यासाठी अगदी सकाळपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील रहिवाशांची झुंबड उडाली होती. राहुल यांच्या स्वागतासाठी येथील रस्ते झेंडे, फलकांनी सजले होते. ठरल्याप्रमाणे राहुल गांधी आले. पण अवघ्या २० मिनिटांत भव्य कचराभूमीची पाहणी करून ते परतले. त्यामुळे राहुल यांचे भाषण ऐकण्यासाठी ताटकळत बसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या ‘दूर’दर्शनावरच समाधान मानावे लागले.

मुंबईमधील देवनार कचराभूमीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. कचराभूमीतील कचऱ्याला अधूनमधून लागणारी आग आणि त्यामुळे पसरणाऱ्या धुरामुळे आसपासच्या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुरामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण वाढत असून मुंबईचेच आरोग्य बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हा प्रश्न सोडविण्यात पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युती अपयशी ठरल्याचा ठपका काँग्रेसकडून ठेवण्यात आला आहे. तात्काळ ही कचराभूमी बंद करावी आणि सरकारकडून पालिकेला तळोजा येथे मिळालेल्या जागेत कचरा टाकावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीत देवनार कचराभूमीच्या मुद्दय़ावरून शिवसेना-भाजपला घेरण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. त्याच पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांच्या कचराभूमीवरील दौऱ्याला वेगळेच वलय लाभले होते.
राहुल गांधी देवनार कचराभूमीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता येणार असल्यामुळे सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांची तेथे धावपळ सुरू झाली होती. त्यामुळे सकाळपासूनच देवनार कचराभूमी परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कचराभूमीत केवळ चार-पाच नेत्यांनाच प्रवेश द्यायचा यावर पोलीस ठाम होते. मात्र कचराभूमीत शिरण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या उत्साहापुढे त्यांना नमते घ्यावे लागले आणि कार्यकर्त्यांचा लवाजमा हळूहळू कचराभूमीत दाखल झाला. उन्हाचा तडाखा वाढत होता. दुपारचे १२ वाजले आणि असह्य काहिलीने कार्यकर्त्यांचे चेहरे काळवंडू लागले. अखेर १२.२५ च्या सुमारास राहुल गांधी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासमवेत कचराभूमीत दाखल झाले. गाडीतून उतरल्यानंतर वृत्तवाहिन्यांच्या गराडय़ात न अडकता ते थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पोहोचले. सोबतच्या नेत्यांना कळण्यापूर्वीच ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर चढले आणि कचराभूमीतून बाहेर पडणाऱ्या धुराची पाहणी करू लागले. पालिका अधिकारी आणि चेंबूरमधील काही रहिवाशांशी चर्चा करीत ते माघारी फिरले. पत्रकारांशी ते काही मिनिटेच बोलले आणि गाडीत बसून पुढच्या दौऱ्यावर रवाना झाले.
कार्यकर्त्यांची निराशा
कचराभूमीबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. राहुल गांधी यांची गाडी बाहेर येत असल्याचे दिसताच बराच वेळ रणरणत्या उन्हात ताटकळणाऱ्या कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला. ‘राहुल गांधी आगे बढो, हम तुमारे साथ है’, ‘राहुल गांधी झिंदाबाद’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला आणि परिसरातील वाहतूक कोलमडली. राहुल गांधी यांनी छोटेखानी भाषण करावे अशी सर्वाची इच्छा होती. पण पुढच्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी निघून गेले.

आत जाण्यावरूनही धुसफूस
राहुल गांधी येणार असल्यामुळे काँग्रेसच्या बहुतांश सर्वच नरसेवकांनी देवनार कचराभूमीकडे धाव घेतली होती. पण विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि मोजक्याच तीन-चार नगरसेवकांनी कचराभूमीत प्रवेश मिळाला. मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष आणि नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांना देवनार कचराभूमीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक कार्यकर्त्यांसोबत कचराभूमीच्या बाहेरच ताटकळत उभी होती. काँग्रेसमधील एका गटाने स्वपक्षाच्या काही नगरसेवकांना जाणूनबुजून राहुल गांधीपासून दूर ठेवल्याची कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

या विद्रुपीकरणाचे काय?
राहुल गाधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेस नेत्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स झळकवून न्यायालयाच्या आदेशांचा भंग केला. मुंबई बॅनरमुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले असतानाही मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांनी ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी बॅनर्स झळकविले होते. देवनार कचराभूमीच्या बाहेरचा रस्ता बॅनर्स आणि काँग्रेसच्या झेंडय़ांनी व्यापून गेला होता. राहुल गांधीच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स पालिकेने उतरवू नयेत यासाठी काँग्रेस नेते आणि नगरसेवकांकडून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव येत होता. काही नेत्यांचे अधिकाऱ्यांशी खटकेही उडाल्याचे समजते.