कलंकित मंत्र्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने काढण्यात येणारा वटहुकूम टराटरा फाडून टाकण्यासारखा आहे, असे विधान करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि स्वपक्षीय मंत्र्यांना अडचणीत आणले होते. आता ‘आदर्श’ अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे मत मांडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पेचात पकडले आहे. स्वपक्षीय सरकारला अडचणीत आणण्यापेक्षा कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच परिणामांचा विचार राहुल यांच्या पातळीवर होत नसल्यानेच ही वेळ येते, असेच चित्र आहे.
लालूप्रसाद यादव यांना वाचविण्याच्या उद्देशानेच शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होऊ नये या उद्देशाने वटहुकूम काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. यावरून सरकारवर टीका होऊ लागली. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हा वटहुकूम टराटरा फाडून टाकण्याच्या लायकीचा असल्याचे मतप्रदर्शन केले आणि परदेश दौऱ्यावरून परतल्यावर मनमोहन सिंग यांना हा वटहुकूम मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. राहुल गांधी यांनी एकीकडे पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरीकडे सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या कोअर समितीलाच खोटे पाडले होते.
मुख्यमंत्री अडचणीत
गेले तीन वर्षे स्वच्छ प्रतिमा जपणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ‘आदर्श’ अहवाल फेटाळल्याबद्दल टीका होऊ लागली होती. दिल्लीत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यावरच हा अहवाल फेटाळण्याचा निर्णय घेण्यात झाला होता. काँग्रेसच्या दैनंदिन कारभारात राहुल गांधी लक्ष घालीत असल्याने ‘आदर्श’ अहवाल फेटाळण्याचा निर्णयाची त्यांना बहुधा कल्पना असावी. अथवा सोनिया गांधी किंवा अहमद पटेल यांच्या पातळीवर हा निर्णय घेतला असला तरी राहुल यांना पुसटशी तरी कल्पना असेल. पण नरेंद्र मोदी यांनी ‘आदर्श’ वरून राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढविल्याने काँग्रेस किंवा राहुल यांच्या गोटात अस्वस्थता पसरली. यातूनच महाराष्ट्रातील स्वपक्षीय सरकारच्या विरोधात राहुल गांधी यांनी मतप्रदर्शन करत अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाच्या फेरविचाराचा आदेश दिला.
मिलिंद देवरा यांची ‘सूचक वर्दी’
मिलिंद देवरा यांनी स्वपक्षीय सरकारच्या विरोधात ट्विटरच्या माध्यमातून विरोधी सूर लावायचा आणि राहुल गांधी यांनी तसेच मतप्रदर्शन करायचे हे लागोपाठ दुसऱ्यांदा झाल्याने देवरा यांचे मत म्हणजे ‘सूचक वर्दी’ असल्याचे काँग्रेसच्या गोटात मानले जाते. कलंकित मंत्री किंवा लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याचा वटहुकूम काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यावर या विरोधात मिलिंद देवरा यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधी सूर लावला होता. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. देवरा यांनी सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन केल्यावर हे राहुल गांधी यांचेच मत असावे, अशी शंका काँग्रेसच्या वर्तुळात होती.
“पक्षश्रेष्ठींचा विश्वास गमावल्याने ‘आदर्श’ गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा.”
विनोद तावडे, विरोधी पक्षनेते

“‘आदर्श’ अहवालाबाबत मुख्यमंत्री फेरविचार करणार असल्यास त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल. आम्ही ही भूमिका आधीच जाहीर केली होती. यापुढे मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी.”
नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते

“कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करावाच लागतो. राहुल गांधी नेमके यातच कमी पडतात की काय, अशी शंका येते. आधी निर्णय घ्यायचा नंतर तो एका व्यक्तीच्या आग्रहाखातर बदलायचा, असे करताना मित्रपक्षांना कशाला अडचणीत आणता? नवी दिल्लीच्या इशाऱ्याशिवाय हा अहवाल फेटाळण्याचा धाडस मुख्यमंत्री करूच शकत नाहीत. आता राहुल यांनी पुन्हा हा निर्णय रद्द करण्याचा आग्रह धरणे हे चुकीचे आहे.”
प्रफुल पटेल, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री