पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून उमेदवार निवडण्याची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची योजना राज्यातील वर्धा मतदारसंघात चांगलीच अंगलट येऊ लागली आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात मोठय़ा प्रमाणावर बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचे लक्षात आल्याने जवळपास ५०० नावे सोमवारी मतदार यादीतून वगळण्यात आली.
वर्धा मतदारसंघात विद्यमान खासदार दत्ता मेघे आणि राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्यात घमासान सुरू आहे. दत्ता मेघे हे आपले पुत्र सागर यांच्या उमेदवारीसाठी  पक्षाकडे आग्रही असतानाच अचानक, उमेदवार निवडीसाठी पदाधिकाऱ्यांची मते घेण्याची टूम निघाली. या मतदारसंघात माजी प्रदेशाध्यक्षा कै. प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यादेखील इच्छुक आहेत. पक्ष संघटनेवर रणजित कांबळे यांचे वर्चस्व असल्याने मतदान झाल्यास चारुलता टोकस या बाजी मारू शकतात. यातूनच मतदार यादीत नावे घुसविण्यासाठी स्पर्धा लागली. यामुळेच वर्धा मतदारसंघाचा यंदा समावेश करू नये, अशी मागणी करणारे पत्र दत्ता मेघे यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविले आहे. मेघे यांच्या समर्थकांनी मोठय़ा प्रमाणावर बोगस नावे मतदार यादीत घुसविल्याचा आरोप केला जातो. या नावांना कांबळे यांच्या गटाने आक्षेप घेतल्यावर दिल्लीहून निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याने सोमवारीच जवळपास ५०० नावे वगळली. सेवादल प्रतिनिधी म्हणून नावे घुसविण्यात आली होती. पण पदाधिकारी म्हणून ते सिद्ध होऊ शकले नाही. या नावांची खात्री होऊ शकली नाही, असा शेरा मारण्यात आला आहे. वर्धा मतदारसंघात हा गोंधळ असताना लातूर मतदारसंघात मात्र आतापर्यंत सारे सुरळीत झाले आहे. लातूर मतदारसंघाच्या मतदार यादीतून केवळ चारच नावे वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राहुल गांधी यांनी वेगळ्या उद्देशाने हा प्रयोग राबविला असला तरी त्यातून मतदारांना आकर्षित करण्याकरिता काही मतदारसंघांमध्ये चांगला ‘भाव’ देण्यात आल्याचे समजते. वर्धा मतदारसंघात मतदार यादीत नावे असलेल्यांना ‘भाव’ येऊ लागल्याचे समजते.
भाजपचे थांबा आणि वाट पाहा!
वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांचे नाव भाजपच्या यादीत निश्चित करण्यात आले होते. पण ते जाहीर करण्यात आलेले नाही. काँग्रेसच्या निवड पद्धतीत निकाल विरोधात गेल्यास सागर मेघे यांना स्वीकारण्याची भाजपची योजना आहे. यापूर्वी भाजपच्या वतीने सागर मेघे हे विधान परिषदेवर निवडून गेले होते. यामुळेच वर्धा मतदारसंघातील घडामोडींवर भाजपचे बारीक लक्ष आहे. दत्ता मेघे यांचे भाजप नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध लक्षात घेता भाजपची उमेदवारी मिळण्यात त्यांना अडचण येणार नाही.