‘बालिका वधू’फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला तिचा प्रियकर आणि निर्माता राहुल राज सिंग याला उच्च न्यायालयाने अखेर सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. राहुलने प्रत्युषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा कुठलाही पुरावा नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने त्याचा अर्ज मंजूर केला.

सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यावर राहुलने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्यासमोर त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस साक्षीदारांच्या जबाबांवरून प्रत्युषा आणि राहुलमध्ये वाद होता तसेच राहुल तिला मारहाण करीत असल्याचे स्पष्ट होत असले तरी त्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा कुठलाही पुरावा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

तसेच त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करताना दोन आठवडे आठवडय़ातून तीन वेळा बांगूरनगर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची अट न्यायालयाने घातली आहे.