प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार राहुल रॉय यांना मोटर अफलिया (बोलण्याचा त्रास) उद्भवू लागल्याने मिरा रोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल रॉय आगामी चित्रपट ‘LAC- Live the Battle’च्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नानावटी रुग्णालयातून त्यांना आता मोटर वोक्हार्ट रूग्णालयात हलवण्यात आलं आहे.

रूग्णालयातील न्यूरोलॉजी सल्लागार डॉ. पवन पै यांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीत आढळून आले की, राहुल रॉय यांना मोटर अफलिया (बोलण्यास अडचणी जाणवणे) आणि ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यामुळे शरीराच्या उजव्या बाजूला त्याचा परिणाम झाला आहे. एमआरआय चाचणीत मेंदूच्या उजव्या धमणीत स्ट्रोक दर्शविण्यात आला होता. याशिवाय रॉय यांच्या हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. म्हणूनच त्यांना एक दिवस अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.

याशिवाय रॉय यांना स्पीच थेरपी आणि फिजिओथेरपी दिली जात आहेत. तसेच रक्त पातळ करण्यासाठी इंजेक्शन आणि औषधोपचार दिले जात आहे. १९९० साली आलेल्या ‘आशिकी ‘ या चित्रपटातून राहुल रॉय प्रसिद्धीझोतात आले होते.