07 March 2021

News Flash

पाणीपुरी कारखान्यांवर छापे

मंडाले येथील कारखाना सुरू होता तर अन्य ठिकाणचे कारखाने बंद आढळून आले.

(संग्रहित छायाचित्र)

अस्वच्छ फरशीवर पुऱ्या लाटण्याचे काम; मानखुर्द, गोवंडीत कारवाई

चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटणारी ‘पाणीपुरी’ अनेक जण चवीने आणि आवडीने खात असतात. अन्न आणि औषध प्रशासनाने शनिवारी मुंबईत मानखुर्द, गोवंडी परिसरात पाणीपुरी बनविणाऱ्या कारखान्यांवर छापे टाकल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चारपैकी एक कारखाना सुरू होता आणि तेथे अत्यंत अस्वच्छ वातावरणात पाणीपुरीच्या पुऱ्या तयार केल्या जात होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान घटनास्थळावरून मैदा, रवा आणि पुऱ्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच अन्नसुरक्षा कायद्याखाली संबंधितांना नोटीस बजावून पुऱ्या तयार करण्याचे काम थांबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मंडाले, मानखुर्द येथील एका, हनुमान नगर येथील दोन आणि महाराष्ट्र नगर येथील एका कारखान्यावर छापे टाकण्यात आले.

मंडाले येथील कारखाना सुरू होता तर अन्य ठिकाणचे कारखाने बंद आढळून आले. मंडाले येथे पाणीपुरीच्या पुऱ्या फरशीवर लाटल्या जात असल्याचे आढळून आले. मैदा मळण्याचे काम सुरू होते. मात्र सगळीकडे अस्वच्छता दिसून आली. सीताराम तिलकधारी मिमाद, रामनिशाद, निशाद रामलाल कांताराम, अजय महेंद्रगुप्ता यांच्या कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त अन्नापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काही वर्षांपूर्वी ठाणे येथे पाणीपुरी तयार करण्याच्या भांडय़ात ‘तो’ विक्रेता लघुशंका करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

पुऱ्या अस्वच्छ फरशीवर लाटल्या जात  होत्या. मैदा मळण्याचे काम सुरू होते. या सर्व ठिकाणी अस्वच्छता आढळून आली. नागरिकांनी रस्त्यावरचे पदार्थ खाताना सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:41 am

Web Title: raids on pani puri factories in mumbai food and drug administration
Next Stories
1 पावसाने जुलै महिन्याची सरासरी ओलांडली
2 पावसाळ्यात आतापर्यंत ४६३ झाडांची पडझड
3 अकरावीच्या ‘कटऑफ’चे गणित बदलले
Just Now!
X