रायगडावर शिवराज्याभिषेक सोहोळ्यासाठी आलेल्या एका तरुणाचा बुधवारी डोक्यात दगड पडून दुर्देवी मृत्यू झाला. अशोक दादा उंबरे (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे. अशोक शिवराज्याभिषेक सोहळयासाठी गडावर आला होता. रायगडावरून खाली उतरत असताना गडावरून दगड सुटून  थेट डोक्यात पडल्याने अशोकचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत अन्य एक शिवभक्त जखमी झाला आहे. त्याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पायऱ्या उतरून येणाऱ्या शिवभक्तांची हत्ती तलाव ते महादरवाजा दरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे प्रत्येक शिवभक्ताला तो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

अशोक दादा उंबरे उस्मानाबादचा होता. अशोक शिवराज्याभिषेक सोहोळ्यानंतर पायऱ्या उतरून खाली येत असताना, गडावरून सुटलेला एक दगड थेट त्याच्या डोक्यावर  आदळला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला पाचाड येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता. त्याचा मृतदेह नंतर महाड ग्रमीण रूग्णालयात आणण्यात आला.

दरम्यान, दगड कोसळण्याच्या दुसऱ्या घटनेत अमित मांगरे (रा. खेड शिवापूर, जि. पुणे) हा तरूण जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी महाड ग्रमीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहोळ्यानंतर गड उतरण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. अरूंद पायऱ्या आणि अरूंद महादरवाजाच्या ठिकाणी शिवभक्तांना पुढे जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताला तो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती, अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील हे महादरवाजाजवळ गेले आणि त्यांनी शिवभक्तांना आवश्यक त्या सूचना देत ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले.