रेल्वे अपघात रोखण्यासाठी आढावा समितीची पहिली बैठक अयशस्वी

रेल्वेतर्फे सदोष आकडेवारी पुढे आल्याने खासदार नाराज
भावेश नकाते अपघात प्रकरणानंतर थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशावरून रेल्वेमार्गावरील अपघात रोखण्यासाठी स्थापन झालेल्या आढावा समितीची पहिली बैठक रविवारी पार पडली. मात्र काही खासदारांची अनुपस्थिती, रेल्वेतर्फे पुढे आलेली सदोष आकडेवारी, त्यामुळे झालेली इतर सदस्यांची निराशा यामुळे ही बैठक चांगलीच ‘रंगली’.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांचा आढावा घेण्यासाठी नऊ सदस्यीय समिती नेमली होती. या समितीत एका प्रवासी एजण्टच्या समावेशामुळे आधीच वादाच्या फेऱ्यात सापडलेल्या या समितीची पहिली बैठक रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील सभा कक्षात पार पडली. लोकसभा निवडणुकीआधी रेल्वेच्या प्रश्नांबाबत कंठ फुटलेल्या खासदार पूनम महाजन या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी या बैठकीस पाठवला. तर खासदार अरविंद सावंत हेदेखील बैठक सुरू झाल्यानंतर १५-२० मिनिटांतच दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले.
त्यानंतर चाललेल्या या बैठकीदरम्यान अपघात रोखण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करता येतील का, याबाबत खासदार किरीट सोमय्या, खासदार राजन विचारे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई. रवींद्रन्, केतन गोराडिया आणि आर. नागवाणी यांनी विविध पर्याय मांडले. या दरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी या समितीपुढे अपघातांबाबत आकडेवारी सादर केली. मात्र, ही आकडेवारी अपघात कसा घडला, यानुसार सादर झाल्यास उपाययोजना करणे सोपे जाईल, असे मत सदस्यांनी मांडले.
यावर उत्तर देताना अशा शास्त्रीय पद्धतीने आकडेवारी उपलब्ध नसून अपघात टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाच फायदेशीर असल्याची भूमिका महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सूद यांनी घेतल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीच मांडलेली आकडेवारी अशास्त्रीय असेल, तर ही बैठक पुढे चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे सांगत सोमय्या बैठकीतून बाहेर पडले. याबाबत आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचीही भेट घेणार असून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना तातडीच्या उपाययोजना करण्यात काहीच रस नसल्याचे त्यांना सांगणार आहोत, असेही सोमय्या यांनी सांगितले. त्यांच्या पाठोपाठ दोन्ही महापालिकांचे आयुक्तही निघाले. मात्र, चैत्यभूमीवरील परिस्थिती पाहण्यासाठी आपण लवकर निघाल्याचे मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केले.