लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये खाद्यपदार्थाच्या मूळ किमतीपेक्षा अधिक दर लावून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या कंत्राटदारांविरोधात तक्रारींची संख्या वाढली आहे. या ‘खादाड’पणाविरोधात प्रवाशांनी आयआरसीटीसीकडे तक्रारी केल्या असून रेल्वे स्थानकातील आयआरसीटीसीच्या फूड मॉलमधील खाद्यपदार्थावर जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत. गेल्या सहा महिन्यांत विविध प्रकारच्या एक हजार १३७ तक्रारी आयआरसीटीसीकडे आल्या असून गेल्या वेळच्या तुलनेत त्यात चौपटीने वाढ झाली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत अशा प्रकारच्या केवळ ५७३ तक्रारी आल्या होत्या.

रेल्वे प्रवासात प्रवाशांची गैरसोय होऊ  नये म्हणून आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपरेरेशन)कंत्राटदारांमार्फत लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये खाद्यपदार्थ सेवा पुरवली जाते. खाद्यपदार्थाच्या किमतींवर आयआरसीटीसीकडून शिक्कामोर्तब केले जाते आणि त्यांना काही अटीही घातल्या जातात. यात खाद्यपदार्थाचा दर्जा चांगला ठेवण्याबरोबरच गाडय़ांमध्ये खाद्यपदार्थाची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दलही अटी नमूद केल्या असतात. मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांकडून त्याचे सर्रास उल्लंघन केले जाते. आयआरसीटीसीकडे एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत विविध प्रकारच्या दोन हजार १५० तक्रारी आल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी खाद्यपदार्थासाठी ठरलेल्या रकमेऐवजी जादा दर आकारल्यासंबंधी आहेत. त्याविरोधात एक हजार ८५ तक्रारी करण्यात आल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

खाद्यपदार्थाचा दर्जा आणि त्याच्या परिमाणाबाबतही प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दर्जा आणि परिमाण योग्य नसल्याबाबत ४६८ तक्रारी करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये देण्यात येणारी सेवेबाबत आयआरसीटीसीकडे प्रवाशांनी ४६६ तक्रारी केल्या आहेत.

प्रवाशांकडे ‘टीप’चीही मागणी

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करताना कंत्राटदार कर्मचाऱ्यांकडून पदार्थाच्या मूळ किमतीव्यतिरिक्त जादा दराची आकारणी केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्याचबरोबर टीप्सचीही मागणी केल्याचे अजब प्रकार प्रवाशांबाबत घडत असल्याचे समोर आले आहे. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ मध्ये ३२ तक्रारी, तर एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये टीपविरोधात ३७ तक्रारी आयआरसीटीसीकडे आल्या आहेत.