मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. एकीकडे मुंबईकरांवर रेल्वे बंद पडल्याने विघ्न आले असतानाच रेल्वे मंत्री पियुष गोयल हे लालबागमध्ये विघ्नहर्त्याच्या दर्शनला पोहचल्याचे पहायला मिळाले. यामुळे सामान्य मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पियुष गोयल यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुंबई ठप्प झाली असतानाचा देव दर्शनाला आलेल्या गोयल यांच्यावर राजकीय टीकाही केली जात आहे. राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ‘गोयल यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे हा प्रचाराचा भाग आहे,’ अशी टीका केली आहे.

आज सकाळपासूनच कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील शीव, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांमध्ये रुळावर पाणी साठल्याने ठाणे ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर हार्बर मार्गावरही ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्ग वगळता इतर सर्व मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ठप्प झाली असून अनेक प्रवाशी अडकून पडले आहेत. एकीकडे मुंबईची लाइफलाइन असणारी रेल्वे सेवा कोलमडून पडलेली असतानाच रेल्वे मंत्री मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मात्र ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आल्याचे समजते.

आज रस्ते तसेच रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून त्यामुळे अनेक गणेश मंडळांमधील गर्दी ओसरल्याचे पहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनला येणाऱ्या भक्तांची गर्दीही पावसामुळे ओसरली आहे. दर्शनासाठी तासन् तास वाट पहाव्या लागणाऱ्या अवघ्या लालबागच्या राजाचे दर्शन अवघ्या दहा मिनिटांमध्ये घेता येत आहे.