कोकण रेल्वेमार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांनी घटनास्थळी आणि नंतर मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात धाव घेतली खरी, मात्र त्यांची ही भेट म्हणजे ‘प्रसिद्धीबाजीचा भपका’च असल्याचे जाणवत होते. कॅमेऱ्यांच्या ‘क्लिक्क्लिकाटा’त खरगे यांनी आपली रुग्णालय भेट अगदी १५ मिनिटांत संपवली आणि कोणत्याही प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे न देता मंत्री महोदय दिल्लीकडे रवाना झाले.
देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात रेल्वे अपघात झाला की, त्या भागात जाऊन पाहणी करण्याचा संकेत खरगे यांनीही पाळला. रविवारी नागोठणे-रोहा या स्थानकांदरम्यान दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर गाडीला झालेल्या अपघातानंतर सोमवारी खरगे मुंबईला आले. तेथून खरगे यांनी अपघातस्थळ गाठले आणि या स्थळाची पाहणी केली. दिल्लीला परतताना मुंबईला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी ते सायंकाळी सव्वासातच्या सुमारास रुग्णालयात पोहोचले.
रुग्णालयातील क्रमांक ९ आणि ३ या दोन कक्षांत अपघातग्रस्त रुग्णांना ठेवले होते. या दोन्ही कक्षांना खरगे यांनी भेट दिली आणि रुग्णांची विचारपूस केली. ‘तुम्ही काळजी करू नका. तुमच्या उपचाराचा सर्व खर्च रेल्वे करणार आहे. बरे व्हा!’ असे रेल्वेमंत्री म्हणाल्याचे तिसऱ्या कक्षात उपचार घेत असलेल्या रवींद्र सावंत यांनी सांगितले. मात्र वृत्तवाहिन्यांच्या आणि छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांच्या ‘क्लिक्क्लिकाटा’त चाललेली ही चौकशी अगदी १० मिनिटांतच आटोपली.

कोकण रेल्वेमार्गाची युद्धपातळीवर दुरूस्ती
दोन मोठय़ा क्रेन आणि तब्बल १५० कामगार व तंत्रज्ञ यांनी कोकण रेल्वेच्या खंडित मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. प्रथम क्रेनच्या साह्य़ाने रेल्वे मार्गावरील डबे बाजूला करण्यात आले. त्यानंतर मार्गाची दुरुस्ती सुरू झाली. रात्रभराच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे ४ वाजून ५ मिनटांनी रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात यश आले. ५ वाजून ५ मिनिटांनी एक मालगाडी मार्गस्थ झाली. त्यापाठोपाठ हजरत निजामुद्दीन राजधानी, जनशताब्दी आणि मंगला एक्स्प्रेस सोडण्यात आल्या.

महत्त्वाच्या प्रश्नांना बगलच!
अपघातग्रस्तांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेला निधी, रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून होणारी चौकशी, त्या चौकशीच्या अहवालानंतर कारवाई करण्याचे आश्वासन, अशा ‘मागील पानावरून पुढे’ प्रकारच्या उत्तरांशिवाय रेल्वेमंत्री काहीच बोलले नाहीत. मुंबई विभागात गेल्या दीड महिन्यांत सातत्याने होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कोणाची, हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालय काय करणार, याबाबत त्यांनी चकार शब्द न काढता आपल्या गाडीत बसणे पसंत केले.

वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा अतिरेक
रुग्णांची विचारपूस करून बाहेर आलेल्या खरगे यांचा ‘बाइट’ घेण्यासाठी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी रेल्वेमंत्र्यांना कक्षाबाहेरच थांबवले. ‘हे रुग्णालय आहे, गोंधळ नको, मुलाखती घ्यायच्या असतील, तर गेटवर घ्या’, अशी विनंती पोलिसांनी वारंवार करूनही या प्रतिनिधींनी त्यांना दाद दिली नाही. अखेर प्रचंड गोंधळात दहा मिनिटे रेल्वेमंत्री तेथेच उभे राहून बोलले. मात्र यामुळे इतर रुग्णांना आणि नातेवाईकांना त्रास झाला.

मुख्यमंत्र्यांना  रेड कार्पेट
* अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जखमींची विचारपूस करण्यासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारापासून चक्क रेड कार्पेट घातले होते.
* रुग्णालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्तही होता.  या संपूर्ण प्रकाराबद्दल रुग्णांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. रुग्णालय प्रशासनाला परिस्थितीचे भान राहिले नाही, अशी चर्चा सुरू होती.
* मुख्यमंत्र्यांसाठी ‘रेड कार्पेट’ घातल्याच्या आरोपाचे प्रशासनाने नंतर खंडन केले. रुग्णालयात स्ट्रेचर घेऊन जाण्यासाठी जो उतार आहे त्यावरील गुळगुळीतपणामुळे रविवारी अनेकजण पडले होते. ते टाळण्यासाठी एक कापड टाकण्यात आले होते. ते लाल रंगाचे होते. त्यास ‘रेड कार्पेट’ संबोधण्यात येत असल्याबद्दल प्रशासनाने आश्चर्य व्यक्त केले आहे.    
* अपघातांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने यावर उपाय योजणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.