पश्चिम रेल्वेच्या योजनेत फक्त बारकोड असलेल्या बाटल्यांवरच सवलती

रेल्वेमार्गावर आणि रेल्वे स्थानकांत पडणाऱ्या रिकाम्या बाटल्यांचा कचरा प्रवाशांमार्फतच कमी करून त्याचा फायदा विविध सवलतींच्या माध्यमातून प्रवाशांनाच देण्याच्या पश्चिम रेल्वेच्या योजनेत ‘रेलनीर’च्या बाटल्यांना स्थान मिळणार नाही. ‘स्वच्छ भारत पुनर्वापर यंत्रा’त केवळ बारकोड असलेल्या बाटल्यांवरच सवलत दिली जाते. ‘रेलनीर’च्या बाटल्यांवर बारकोड नसल्याने ही सवलत त्यांना लागू होत नाही. .

रेल्वेमार्गावर प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच पडण्याची समस्या संपूर्ण भारतीय रेल्वेवर आहे.

त्यावर तोडगा काढत पश्चिम रेल्वेने वोक्हार्ट फाऊंडेशनच्या सहकार्याने प्लॅस्टिकच्या बाटल्या, तसेच टीन यांची विल्हेवाट लावणारे ‘स्वच्छ भारत पुनर्वापर यंत्र’ प्रायोगिक तत्त्वावर चर्चगेट स्थानकात बसवले आहे. हे यंत्र मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली आणि भाईंदर या स्थानकांतही बसवले जाणार आहे. या यंत्रात प्रवाशांनी बाटली टाकल्यावर त्या बाटलीवर बारकोड असल्यास प्रवाशांना विविध उत्पादनांवर सवलत किंवा मोबाइल-ई वॉलेट असे फायदे मिळणार आहेत.

याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांना विचारले असता रेल्वे हद्दीच्या बाहेरूनही प्रवासी बाटल्या घेऊन येतात, त्या बाटल्या या यंत्रात टाकता येतील, असे त्यांनी सांगितले.

पण भविष्यात अनेक स्थानकांवर ही यंत्रे लागल्यावर ‘रेलनीर’च्या बाबतीत ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे या बाटल्यांवरही आता बारकोड टाकावे, असा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने ‘आयआरसीटीसी’कडे पाठवल्याचेही भाकर यांनी सांगितले.

..मग फायदा कसा?

सध्या रेल्वेच्या हद्दीतील सर्वच स्टॉल्सवर किंवा लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये खासगी कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांना परवानगी नाही. त्याऐवजी आयआरसीटीसीच्या ‘रेलनीर’ची विक्री अनिवार्य केली आहे. पण या ‘रेलनीर’च्या बाटल्यांवर बारकोड नाही. त्यामुळे या यंत्रात ‘रेलनीर’ची बाटली सरकवल्यावर हे यंत्र ती बाटली आत घेऊन तिची विल्हेवाट लावते. पण प्रवाशांच्या हाती केवळ कचरा न केल्याचे समाधान पडते. एकीकडे रेल्वेच्या हद्दीत रेलनीर वगळता इतर बाटल्या विकण्यास मनाई आहे. तर दुसरीकडे बारकोड नसल्याने रेलनीर बाटल्या यंत्रात टाकून प्रवाशी कसा फायदा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.