कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे बेकायदा बांधकामांच्या विरोधात होत असलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी या भागातील रहिवाशांनी टिटवाळा-आंबिवली दरम्यानचा रेल्वे मार्ग रविवारी दुपारी एक तासाहून अधिक काळ रोखून धरल्याचे निदर्शनास आले.

मागील तीन दिवसांपासून टिटवाळा परिसरातील ‘बाह्यवळण रस्ता’ मार्गिकेतील, वन विभागाच्या जमिनीवरील ४०० हून अधिक बेकायदा चाळी, गाळे, खोल्या महापालिका, वन विभागाने जमीनदोस्त केले. बाह्य वळण रस्ता (रिंगरूट) मार्गिकेतील चाळीत राहत असलेल्या अनेक रहिवाशांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

रेल्वे मार्ग रोखण्यात आल्याने दुपारच्या वेळेत कल्याणहून कसाऱ्याकडे आणि कसाऱ्याकहून ‘सीएसएमटी’कडे जाणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाडय़ा आंबिवली, टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अडकून पडल्या. या रेल्वे रोकोचा फटका महानगरी एक्सप्रेसला बसला.

चाळींवरील कारवाई थांबवा नाही तर रेल्वे मार्गातून हटणार नाही अशा घोषणा देत रहिवाशांनी रेल्वे मार्ग रोखून धरला. या कारवाईमध्ये रहिवाशांपेक्षा भूमाफियांना मोठा हादरा बसला आहे. माफियांना पालिका आणि वन विभागाला जाब विचारता येत नसल्याने त्यांनी रहिवाशांना पुढे करून टिटवाळा-आंबिवली रेल्वे स्थानक दरम्यानचा रेल्वे मार्ग रविवारी दुपारी अडवून धरला.

कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे डोंबिवली ते टिटवाळा रिंगरूट बांधण्याचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या बल्याणी, उंभार्णी, टिटवाळा, मांडा भागात बेकायदा चाळी अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे रिंगरूट बांधण्यात अडचणी येत आहेत. अतिक्रमण नियंत्रणचे उपायुक्त सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा शहर, उंभार्णी, बल्याणी भागातील सरकारी जमिनी, रिंगरूट मार्गिकेत असलेल्या बेकायदा चाळी तोडण्याचे गुरुवारपासून सुरू केले आहे. वन विभागाने वन विभागाच्या मालकी हक्काच्या जमिनीवरील बेकायदा चाळी पोलीस जमीनदोस्त केल्या आहेत.

मागील १० वर्षांपासून बल्याणी, उंबार्णी भागात भूमाफियांचे साम्राज्य आहे. या भागात पालिकेचे अधिकारी कारवाई जाताना घाबरत होते. उपायुक्त जोशी यांनी पोलीस फौजफाटा घेऊन बेकायदा चाळी जमीनदोस्त केल्या. या खोल्यांमधील रहिवासी बेघर झाल्याने त्यांना संघटितपणे पुढील कारवाई रोखण्यासाठी टिटवाळा येथे रेल रोको केला. रेल्वे पोलिसांनी रहिवाशांना रेल्वे मार्गावरून एक तासाने दूर केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत कल्याण ते कसारादरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली होती.