मध्य रेल्वेच्या टिटवाळा आणि आंबिवली स्थानकादरम्यान नागरिकांनी केलेल्या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळाकरता विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. टिटवाळा-आंबिवली स्थानकादरम्यान बल्याणी परिसरात आज (दि.9) रेल रोको करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार,  वनविभागाने अनधिकृत चाळींवर केलेल्या कारवाई विरोधात येथील नागरिकांनी आज दुपारच्या सुमारास महानगरी एक्स्प्रेस रोखून धरली होती. जवळपास तासभर ही एक्सप्रेस रोखून धरली होती, तसंच दोन्ही बाजूच्या दिशेला रेल रोको करण्यात आला.  शुक्रवारी येथे कारवाई करत वनविभागाने जवळपास चारशे घरं तोडली होती. यामुळे कसारा, आसनगाव, टिटवाळा येथून मुंबईला येणारी लोकल, लांब पल्ल्याची वाहतूक काही वेळाकरता विस्कळीत झाली होती. रेल रोको करणारे सर्व परप्रांतीय असल्याची माहिती आहे.