20 October 2020

News Flash

द्रविता मानसिक धक्क्याखाली

द्रविताची प्रकृती आता धोक्याबाहेर असली तरी, या घटनेने तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.

मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने लोकलच्या दाराशी बोलत असताना चोरटय़ाने डोक्यावर बांबूचा फटका मारल्याने जखमी झालेली द्रविता सिंग या तरुणीच्या हाताची बोटे निकामी झाली असून तिचा उजवा पायही गमवावा लागण्याची भीती आहे. द्रविताची प्रकृती आता धोक्याबाहेर असली तरी, या घटनेने तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.

द्रविता बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकलने सीएसएमटीकडे निघाली होती. वाटेत तिने आपल्या भावाला फोन केला. मात्र, लोकलच्या आतल्या भागात भावाचा आवाज नीट ऐकू येत नसल्याने ती दाराशी येऊन बोलत होती. त्याचवेळी तिच्या डोक्यावर बांबूचा प्रहार करण्यात आला. या आघाताने ती क्षणभर रेल्वेतच खाली बसली. परंतु, चक्कर आल्याने ती खाली पलिकडच्या रुळांवर कोसळली. त्याचवेळी या रुळांवर लोकल येत होती. तिने शुद्ध सावरत हात वर करून मोटरमनला गाडी थांबविण्याचा इशारा दिला. इशारा पाहताच मोटरमनने गाडीचा वेग कमी केला, परंतु गाडी वेगात असल्याने लगेचच थांबणे शक्य नव्हते. गाडी येत आहे पाहून द्रविताने मोठय़ा मेहनतीने स्वत:ला रेल्वे रुळातून बाहेर फेकले, तरी गाडी थांबत असतानाच तिचा डावा हात आणि उजवा पाय रुळाखाली सापडले. परंतु मोटारमनने लगेचच धावपळ करून रेल्वे पोलिसांच्या मदतीने तिला जे.जे. रुग्णालयात दाखले केले. द्रविताने स्वत:ला रुळाबाहेर फेकले नसते, तर आज ती आम्हाला पाहायला मिळायला नसती, असे द्रविताचा भाऊ  दीपक सिंग याने व्यक्त केले.

द्रविता रुग्णालयाता दाखल झाली तेव्हा तिचा डाव्या हाताची करंगळी पूर्णपणे तुटलेली होती. तर्जनी आणि मधल्या बोटालाही मार लागल्याने या बोटांचा काही भाग कापून टाकावा लागला आहे. उजवा पायाचा अंगठाही तुटलेल्या अवस्थेत असल्याने तो ही कापून टाकावा लागलेला आहे. तिच्या हाताच्या बोटांची जखम काही दिवसांमध्ये बरी होईल, मात्र तिच्या पायाच्या तळपायाच्या त्वचेला मोठय़ा प्रमाणात इजा झालेली आहे. आतापर्यंतच्या शस्त्रक्रियेमध्ये जखमेच्या भागातील मृत पेशी काढून टाकलेल्या आहेत. परंतु तिच्या पायाची जखम कशा रीतीने बरी होत आहे आणि त्याभागातील मृतपेशींचा आढावा शनिवारच्या तपासणीत घेतला जाईल. यामध्ये जर पायाच्या मृत पेशी वाढत असतील तर नाइलाजाने घोटय़ापासून तिचा पाय काढावा लागेल, असे भाटिया रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जन डॉ. शैलेश रानडे यांनी सांगितले. द्रविता रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर काही तासांमध्ये तिची शारीरिक प्रकृती स्थिर झाली असली तरी या घटनेचा तिच्या मनावर मोठय़ा प्रमाणात मानसिक आघात झाला आहे.

बोटे वाचली असती

द्रविता जे.जे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिच्या जखमांवर मलमपट्टी केली. मात्र त्यानंतर जवळपास पाच तास तिच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. म्हणून मग आम्ही तिला भाटिया रुग्णालयामध्ये गुरुवारी दाखल केले. तिला वेळेत उपचार मिळाले असते, तर तिच्या हाताची तिन्ही बोटे वाचली असती, अशी प्रतिक्रिया द्रविताचा भाऊ  दीपक सिंग याने दिली.

उरल्यासुरल्या पायावरही चालेन

या घटनेने द्रविताला मानसिक धक्का बसला असला तरी, तिची उमेद कायम आहे. ‘जमेल तितका पाय वाचवा, त्यावर मी चालेन’ असे मोठय़ा धैर्याने द्रविताने डॉक्टरांना सांगितले आहे.  ‘तिच्या या निर्धाराचा आम्हाला फार अभिमान वाटला. पाय बरा झाल्यावर ती मॅरेथॉनमध्येही धावू शकेल, असा विश्वास आम्ही तिला दिला आहे,’ असे डॉ. शैलेश रानडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 1:48 am

Web Title: railway accident girl dravita singh under mental shocks
Next Stories
1 बेकायदा उत्सवी मंडपांना लवकरच आळा
2 स्थायी समितीवर सभागृह नेत्यांचे ‘विलासी’ हेर
3 आम्ही मुंबईकर : एक‘संघ’ परिवार..
Just Now!
X