मुंबईच्या लोकलमधील गर्दीमुळे आणखी दोन जणांचा जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी सकाळी खोपोली ते ठाणे रेल्वे प्रवासादरम्यान गाडीतून पडून नरेश म्हादू पाटील (३२) या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रात्री कोपर-दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून नितीन आबा चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची गेल्या तीन दिवसांतील ही चौथी घटना आहे. त्यामुळे लोकलप्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठाण्यापलीकडील स्थानकांमध्ये प्रवाशांच्या तुलनेत अपुऱ्या पडणाऱ्या लोकल गाडय़ांमुळे सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी उसळून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी डोंबिवलीतील भावेश नकाते याच्या अपघाताची चित्रफीत समाजमाध्यमातून समोर आल्यानंतर मंगळवारी सकाळीही असाच प्रसंग खोपोलीच्या नरेश म्हादू पाटील यांच्यावर ओढवला. खोपोली स्थानकातून ठाण्याकडे जाणाऱ्या नरेश कळवादरम्यान दारात उभा होता. गर्दीचा लोंढा वाढल्याने तो खाली कोसळला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
दुसरीकडे देहूरोड ते आकुर्डी रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या लोकलमधून तिघे जण खाली पडले. या घटनेत महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार झाली असून मैत्रिणीसह दोघे गंभीर जखमी झाले.