News Flash

‘सीएसटी’लाही लोकल फलाटावर!

मोटरमन आणि गार्ड यांच्यासह या वेळी उपस्थित आणखी एका मोटरमन व गार्डला निलंबित करण्यात आले आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या फलाट क्रमांक पाचवरून पहाटे सुटणारी पहिली गाडी आणताना गाडीवरील ताबा सुटल्याने ती फलाटावर चढल्याची घटना मंगळवारी पहाटे २.३०च्या सुमारास घडली.

गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात * मोटरमनऐवजी गार्डच्या हाती गाडी
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या फलाट क्रमांक पाचवरून पहाटे सुटणारी पहिली गाडी आणताना गाडीवरील ताबा सुटल्याने ती फलाटावर चढल्याची घटना मंगळवारी पहाटे २.३०च्या सुमारास घडली. गाडीत कोणी प्रवासी नसल्याने जीवितहानी झाली नाही. लोकल स्थानकात आणताना मोटरमनऐवजी गार्ड चालवत होता. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी गाडीचा मोटरमन आणि गार्ड यांच्यासह या वेळी उपस्थित आणखी एका मोटरमन व गार्डला निलंबित करण्यात आले आहे. रेल्वेच्या नियमावलीप्रमाणे उपनगरी गाडी चालवण्याचे काम मोटरमन करतो. त्याच्याशिवाय गाडी इतरांनी चालविणे नियमबाह्य़ आहे. मात्र सोमवारी मध्यरात्रीनंतर कसाऱ्याहून आलेली गाडी फलाट क्रमांक पाचमध्ये शिरली. सीएसटी येथे ‘स्टेबलिंग लाइन’ नसल्याने ही गाडी फलाटाबाहेर काढून तेथेच तिची डागडुजी केली जाते. त्याप्रमाणे गार्ड, मोटरमनने जागा बदलून गाडी फलाटाबाहेर काढली. गाडीची डागडुजी झाल्यानंतर ती पुन्हा फलाटावर आणण्यासाठी गार्ड-मोटरमनने जागा बदलणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी गार्डनेच गाडी फलाटावर आणली. तेव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती बंपरला धडकून फलाटावर चढली. या अपघातामुळे बंपर, तसेच फलाटाचे नुकसान झाले. पहाटे २.२७ वाजता हा अपघात झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार समजताच मोटरमन विजय खानोलकर आणि गार्ड शंकर नाईक यांना निलंबित करण्यात आले. तसेच या वेळी कामावर असलेल्या आणखी एका गार्ड व मोटरमनवरही निलंबनाची कारवाई केली. गार्डने गाडीचा ताबा घेणे, ही अत्यंत चुकीची घटना असून, यातून रेल्वे अधिकाऱ्यांचेही अपयश दिसून येते. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा म्हणाले, गार्ड गाडी चालवत होता की नाही, हे आताच सांगणे कठीण आहे. अपघाताच्या चौकशीसाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 2:30 am

Web Title: railway accident on cst station
Next Stories
1 लोकलवर दगडफेक सुरूच
2 भारतीयांची टिवटिव..
3 चारित्र्य प्रमाणपत्रही आता ऑनलाइन मिळणार!
Just Now!
X