वाहतूक तज्ज्ञांच्या मते सध्याच्या सामान्य लोकल गाडय़ांच्या फेऱ्यांवर कोणताही परिणाम होऊ न देता वातानुकूलित लोकल गाडय़ा चालवायच्या असतील स्वतंत्र मार्गिका हवी. तरच इतक्या गाडय़ांचे नियोजन होऊ शकते. अन्यथा मोठय़ा तांत्रिक अडचणी भविष्यात उपस्थित होतील. हे रेल्वेसमोरचे मोठे आव्हान असेल.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच सुरू झालेल्या वातानुकूलित लोकलला २० दिवस होत आहेत. २५ डिसेंबरला जेव्हा ही गाडी सुरू झाली तेव्हा तिची जोरदार चर्चा झाली. अशी चर्चा तीन वर्षांपूर्वी मुंबईकरांच्या सेवेत आलेल्या मेट्रो-१च्या वेळेस झाली होती. पूर्व-पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो-१मुळे मुंबईच्या वाहतूक क्षेत्राची दिशा बदलली. सध्या मुंबईभर विणले जाणारे मेट्रोचे जाळे हे त्याचे उदाहरण होय. तशी दिशा वातानुकूलिल लोकलमुळे बदलेल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र दररोज गर्दीत करावा लागणारा उपनगरीय लोकल प्रवास आरामदायी करण्याचा पर्याय वातानुकूलित गाडीमुळे मुंबईकरांना उपलब्ध झाला आहे.

या गाडीमुळे अनेक वाद उपस्थित झाले असले तरी वातानुकूलित लोकल मुंबईकरांचे भविष्य आहे. जपान, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, चीन, इंग्लंड यासह अन्य काही देशांत वातानुकूलित हाय-स्पीड रेल्वे ५० वर्षांपूर्वीच सुरू झाल्या होत्या. युरोपमध्ये डिझेलवरील पहिली हायस्पीड वातानुकूलित गाडी १९६० साली धावली. त्यानंतर १९६४ साली विजेवर धावणारी रेल्वेगाडी जपानमध्ये सुरू झाली.

मुंबईत वातानुकूलित लोकलची चर्चा २००२ साली सुरू झाली. त्याचे प्रत्यक्ष नियोजन २०१३ साली झाले. त्यानंतर ५२ कोटी रुपये खर्चून पहिली वातानुकूलित लोकल गाडी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये एप्रिल, २०१६मध्ये दाखल झाली. या लोकलची उंची आणि चालविण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर उपाय काढेपर्यंत एक वर्ष गेले. मध्य रेल्वेसाठी आलेली गाडी कुर्ला ते सीएसएमटीदरम्यान असलेले कमी उंचीचे पूल आणि लोकलची फलाटाच्या तुलनेत असलेली अधिकची उंची यामुळे अखेर पश्चिम रेल्वे मार्गावर चालवायचे ठरले. परंतु ही लोकल सुरू झाल्यानंतरही त्या मागील शुक्लकाष्ठ संपलेले नाही. नेहमीच्या कमी झालेल्या फेऱ्या, भरमसाठ भाडे यामुळे प्रवाशांनी या गाडीकडे पाठच फिरवल्याचे दिसून येते.

उपनगरीय रेल्वेचा प्रवास प्रथमपासून स्वस्त आणि मस्त राहिला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर कमीत कमी पाच रुपये तिकीट मोजावे लागते. तर बोरिवलीपर्यंत द्वितीय श्रेणीकरिता १५, विरापर्यंत २० तर डहाणूपर्यंत ३५ रुपये, कल्याणपर्यंत १५ आणि खोपोलीपर्यंत ३० रुपये तिकीट आहे. प्रथम श्रेणीचेही तिकीट कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त १७० रुपये आहे. अशाच प्रकारचे भाडेटप्पा मध्य रेल्वेवरही आहे. तुलनेत सध्याच्या जलद वातानुकूलित लोकलचे तिकीट कमीत कमी ६० रुपये आणि जास्तीत जास्त २०५ रुपये आहे. स्वस्तातला प्रवास उपलब्ध असताना प्रवासी महागडय़ा वातानुकूलित गाडीकडे जाण्यास तयार नाहीत. या परिस्थितीत कदाचित उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फरक पडेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, वातानुकूलित लोकलकडे प्रवाशांना आकर्षित करण्याकरिता प्रथम श्रेणीच्या तिकीट आणि पासधारकांना थोडे जास्त भाडे आकारून वातानुकूलित गाडीने प्रवासास मुभा देण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. पहिली गाडी चालविताना रेल्वेच्या नाकीनऊ येत असताना आणखी २१० वातानुकूलित गाडय़ा रेल्वेच्या सेवेत आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. या इतक्या गाडय़ा रेल्वेच्या सेवेत येणार असतील तर भविष्यात सर्वच सेवा रेल्वे वातानुकूलित करणार का? कारण, रेल्वेच्या सध्याच्या वेळापत्रकाला धक्का न लावता इतक्या गाडय़ा चालविणे रेल्वेला शक्यच नाही.

सध्या पश्चिम रेल्वेवरील बोरिवली, अंधेरी, नालासोपारा, विरार, भाईंदर, कांदिवली, गोरेगाव, दादर, सांताक्रूझ तर मध्य रेल्वेवरील डोंबिवली आणि ठाणे स्थानक गर्दीचे असून त्यापाठोपाठ कल्याण, दिवा, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांचा नंबर लागतो. ज्या झपाटय़ाने प्रवासी संख्या वाढत आहे, त्या तुलनेत मुंबई उपनगरीय रेल्वेचा विकास होताना दिसत नाही. सरकते जिने, लिफ्ट यांसारख्या सुविधा स्थानकात देण्यात आल्या. मात्र गर्दीवर म्हणावा तसा उतारा सापडलेला नाही.