स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना ‘ओलीस’ धरणाऱ्या मध्य रेल्वेच्या मोटरमननी शुक्रवारी पुन्हा एकदा तोच ‘तमाशा’ केला. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या एका मोटरमनने सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापकाला मारहाण केल्याबद्दल त्याची चौकशी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या मोटरमनला निलंबित केले होते. हे निलंबन मागे घ्यावे, या अतक्र्य मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने ‘रेल्वे बंद’ आंदोलन केले. आंदोलकांचा वाद रेल्वे प्रशासनाशी होता मात्र हा राग त्यांनी प्रवाशांची कुचंबणा करून व्यक्त केला.
विवेक सिसोदिया नावाच्या एका मोटरमनची आणि रेल्वेचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक त्रिपाठी यांची काही कारणावरून बाचाबाची झाली होती. त्या वेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे काही कार्यकर्ते आणि सिसोदिया यांनी त्रिपाठी यांना मारहाण केली. याबाबत रेल्वे पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. या तक्रारीचा आधार घेत रेल्वे प्रशासनाने सिसोदिया यांना चौकशीसाठी निलंबित केले होते. मात्र या निलंबनामुळे संतप्त झालेल्या सीआरएमयुच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना वेठीला धरण्याचा ‘आड’मार्ग स्वीकारला.
सीआरएमएसने प्रवाशांना अशा प्रकारे वेठीला धरल्याचे कळताच मध्य रेल्वे प्रशासनाने या आंदोलकांवर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी आंदोलकांपुढे नमते घेणेच पसंत केले. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सिसोदिया याचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे रेल्वे कामगार संघटनांना प्रवाशांना वेठीस धरण्याचा ‘परवाना’च मिळणार असल्याची प्रतिक्रिया काही अधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केली. मात्र याबाबत मुकेश निगम यांना विचारले असता, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन हे निलंबन मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. सिसोदिया यांची चौकशी चालूच राहणार असून ते दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू, असे निगम यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.