News Flash

रेल्वेरुळांच्या बाजूला सध्या कचराच कचरा!

मुख्य मार्गावर डीसी-एसी विद्युत परिवर्तन झाल्यानंतर या मार्गावर कचरा गाडी बंद झाली

मुख्य मार्गावर डीसी-एसी विद्युत परिवर्तन झाल्यानंतर या मार्गावर कचरा गाडी बंद झाली

डीसी-एसी परिवर्तनामुळे रेल्वेची कचरागाडी तडीपार
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाबरोबरच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्यामुळे खुशीत असलेल्या रेल्वेसमोर सध्या वेगळीच समस्या भेडसावत आहे. रेल्वेरुळांच्या बाजूला पडलेला कचरा उचलण्यासाठी रेल्वे चालवत असलेली कचरा गाडी केवळ डीसी विद्युतप्रवाहावर चालणारी होती. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर ही गाडी चालवणे शक्य नाही. परिणामी रेल्वे रुळांच्या बाजूचा हा कचरा कसा उचलायचा, हे कोडे रेल्वेला पडले आहे.
रेल्वेरुळांची, प्लॅटफॉर्मची किंवा संरक्षक भिंतींची कामे करताना खूप माती, सिमेंट, खडी आणि इतर कचराही जमा होतो. रेल्वेचे कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार रेल्वेरुळांमधील कचरा गोळा करून तो या रुळांच्या बाजूलाच एकत्र करून ठेवतात. हा कचरा उचलण्यासाठी रेल्वे दर रात्री एक गाडी हार्बर मार्गावर आणि एक गाडी मुख्य मार्गावर चालवत असे. या गाडीला कचरा गाडी असेच म्हणतात. रेल्वेच्या सेवेतील सर्वात जुनी गाडी कचरा गाडी म्हणून वापरली जात होती. ही गाडी डीसी विद्युतप्रवाहावर चालणारी आहे.
मुख्य मार्गावर डीसी-एसी विद्युत परिवर्तन झाल्यानंतर या मार्गावर कचरा गाडी बंद झाली. पण हार्बर मार्गावर मात्र ही गाडी चालवली जात होती. या गाडीद्वारे उचललेला कचरा वाशी येथील खाडीत टाकला जात होता. आता हार्बर मार्गावरही डीसी-एसी विद्युत परिवर्तन झाल्यानंतर ही गाडी येथेही चालणे शक्य नाही. त्यामुळे मध्य रेल्वेपुढे मोठी समस्या उभी राहिली आहे.
रेल्वेरुळांच्या बाजूला सध्याही खूप कचरा पडून आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्या शेवटीही पोत्यांमध्ये हा कचरा पडलेला दिसतो. पावसाळ्याआधी हा कचरा उचलला नाही, तर रेल्वेला परिचालनात मोठय़ा अडचणी सहन कराव्या लागणार आहेत. मुंबईच्या रुळांवरून दर दिवशी आठ हजारांपेक्षा जास्त गोणी भरून कचरा निघतो. लवकरच एसी विद्युतप्रवाहावर चालणारी कचरा गाडी सुरू केली नाही, तर सध्या उपलब्ध असलेल्या गाडीच्या दोन्ही बाजूंना इंजिन लावून ती चालवावी लागेल. हे काम उपनगरीय रेल्वेमार्गावर खूपच कटकटीचे ठरेल, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2016 4:43 am

Web Title: railway admintarion worry over garbage at railway track
टॅग : Garbage
Next Stories
1 पोलिसांवर हात उगारणाऱ्यांची मजल वाढली!
2 प्रकाश प्रदूषणाचा टक्का वाढला
3 युद्धग्रस्त येमेनमधील ‘ऑपरेशन राहत’च्या अतुलनीय शौर्याचा गौरव!
Just Now!
X