रेल्वे विकास शिबिरात मध्य रेल्वेच्या विविध कल्पना; प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेचा प्रयत्न

रेल्वेच्या १६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशभरातील रेल्वे अधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्याकडून रेल्वेमधील बदलासाठीच्या संकल्पनांचा ऊहापोह करणाऱ्या रेल्वे विकास शिबिराला दिल्लीत सुरुवात झाली. या शिबिरात मध्य रेल्वेनेही आपल्या पाच संकल्पना मांडल्या आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेकडून २५ अधिकारी व कर्मचारी दिल्लीतील सूरजकुंड येथे होणाऱ्या शिबिरासाठी पोहोचले आहेत. रेल्वे स्थानकांची इत्थंभूत माहिती देणारे अ‍ॅप, वृद्ध प्रवाशांना घरापासूनच मदत करण्यासाठी सेवा पुरवठादार, खानपान सेवेत सुधारणा, स्वच्छतेसाठी वेगळ्या कल्पना आणि मनोरंजनाची साधने आदी पाच कल्पना मध्य रेल्वे या शिबिरात मांडणार आहे. या कल्पना मध्य रेल्वेच्या पाच विभागांमधील अधिकाऱ्यांनी मांडलेल्या शेकडो संकल्पनांमधून निवडण्यात आल्या आहेत.

[jwplayer OnydZc5l]

स्थानकाची माहिती अ‍ॅप

जीपीएसमार्फत चालणाऱ्या या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या स्थानकाची इत्थंभूत माहिती मिळेल. स्थानकातील फलाटांची संख्या, कोणत्या फलाटावरून कोणत्या दिशेला गाडी जाते, प्रसाधनगृहांची संख्या व त्यांची जागा, वैद्यकीय मदत कक्ष, रेल्वे सुरक्षा दल कार्यालय, तिकीट खिडक्या, एटीव्हीएम यंत्रे आदी सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध असेल. हे अ‍ॅप एनटीएस या अ‍ॅपशी जोडल्यास प्रवाशांना स्थानकात येणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाडय़ांचीही माहिती मिळेल.

खानपान सेवा

खानपान सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रवाशांना जास्त पर्याय देण्याऐवजी सामिष आणि निरामिष एवढेच पर्याय देण्याची संकल्पना आहे. विमानात प्रवाशांना खाद्यपदार्थ निवडण्याचे स्वातंत्र्य नसते. त्याच धर्तीवर रेल्वेतही प्रवाशांना या दोन पर्यायांमध्ये रेल्वेकडे असलेल्या पदार्थाचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांशी करार करणार आहेत.

वृद्धांसाठी घरापर्यंत सेवा

अनेकदा एकटे प्रवास करणाऱ्या वृद्धांची चिंता त्यांच्या नातेवाईकांना असते. या वृद्धांना स्थानकावर सोडण्यापासून गंतव्य स्थानकावर त्यांना उतरवून घेण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी नातेवाईकांना घ्यावी लागते. त्याऐवजी रेल्वेतर्फे एखाद्या सेवा पुरवठादाराशी करार करून एकटय़ा वृद्ध प्रवाशांना सेवा पुरवण्याचा विचार आहे. सेवा पुरवठादार वृद्ध प्रवाशांला घरापासून सामानासकट त्यांना त्यांच्या आसनापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. याच सेवा पुरवठादाराचा दुसरा माणूस गंतव्य स्थानकावर या प्रवाशांना उतरवून त्यांच्या मुक्कामापर्यंत पोहोचवेल.

स्वच्छतेसाठी कचरा विकत घ्या!

रेल्वे स्थानकांच्या आसपास असलेला कचरा बहुतांश वेळा खानपान सेवा पुरवठादारांकडूनच केला जातो. त्यावर उपाय म्हणून या पुरवठादारांकडून तो कचरा विकत घेण्याची कल्पना आहे. तसेच रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूला फुलझाडे लावून तेथे पडणाऱ्या कचऱ्याला अटकाव होणार आहे.

मनोरंजन

प्रवाशांना प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी चित्रपट, गाणी, पुस्तके यासाठी एका सव्‍‌र्हरवर हा मनोरंजनाचा मसाला साठवण्यात येईल. प्रवाशांना त्यांच्याकडील मोबाइलवरील ब्लू-टूथच्या माध्यमातून हे चित्रपट, संगीत किंवा पुस्तकांचा आस्वाद घेतील.

[jwplayer 1yLms27W]