नैसिर्गक मृत्यू रोखण्यासाठी त्वरीत उपचार;रुग्णालयात दाखल करण्याचे लोहमार्ग पोलिसांचे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश

मुंबई : रेल्वे स्थानकात आलेल्या बेघरांवर किंवा प्रवाशांवर नैसर्गिक मृत्यू ओढावतो. उपचाराअभावी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याने त्यांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून पुढाकार घेण्यात आला आहे. रेल्वे हद्दीत येताच नैसर्गिक मृत्यूला सामोरे जाणाऱ्या रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करा, असे आदेश लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. गेल्या दोन वर्षांत रेल्वे हद्दीत १ हजार ५५ जणांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवासादरम्यान लोकलमधून पडणे, रेल्वे रूळ ओलांडणे इत्यादी कारणांमुळे शेकडो प्रवाशांना मृत्यूला सामोरे जावे लागते. तर काही प्रवासी गंभीर जखमीही होतात. या घटनांमध्ये लोहमार्ग पोलीस मदतीचा हात पुढे करतात. मात्र रेल्वे हद्दीत नैसर्गिक मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. स्थानकातील फलाटावर, पादचारी पुलांच्या खाली, तिकीट खिडक्यांजवळच अनेक बेघर आश्रयाला आलेले असतात. मात्र विविध कारणांमुळे काहींचा उपचाराअभावी मृत्यू होतो. त्याची नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद लोहमार्ग पोलिसांकडे होते. २०१८ मध्ये ५२२ तर २०१९ मध्ये ५३३ जणांचा रेल्वे हद्दीत नैसर्गिक मृत्यू झाला आहे. यात स्थानकात आश्रयाला आलेल्यांचे प्रमाणच सर्वाधिक असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसानी दिली. तर प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

यासंदर्भात लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी रेल्वे हद्दीत नैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी अशा रुग्णांना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जाणार असल्याचे सांगितले. तसे आदेशच सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. जेणे करून नैसर्गिक मृत्यू कमी होताना त्यांना वाचवणेही शक्य होईल. यात पोलीस कर्मचारी जवळच्या रुग्णालयात त्या रुग्णाला दाखल करतील.