तिकीट खिडक्यांवरील रांगा हे रेल्वे प्रवासाचे एक स्वाभाविक लक्षण होते. स्थानकात असलेल्या दोन-चार तिकीट खिडक्या आणि त्यांच्यापुढे मारुतीच्या शेपटीसारख्या लांबच लांब पसरलेल्या रांगा, हे चित्र अगदी अलीकडल्या काळापर्यंत मुंबई उपनगरीय मार्गावर दिसत होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही रांग कमी करण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात रेल्वे कमी पडत आहे..
फार जुनी नाही, अगदी दहा वर्षांपूर्वीची गोष्ट! शनिवार किंवा रविवारच्या दिवशी कुटुंबकबिल्यासकट बाहेर फिरायला जायचं, म्हणजे कर्त्यां पुरुषाच्या पोटात गोळा येत असे. या पोटात येणाऱ्या गोळ्याचं कारण खर्च नसून रेल्वेचं तिकीट, त्यासाठीच्या रांगा आणि त्यानंतर रेल्वेला असणारी गर्दी! लग्नाचा मुहूर्त किंवा तत्सम काही ठरावीक वेळेतलं काम असेल, तर लोक मुहूर्ताच्या चांगले तीन तीन तास आधी घरातून बाहेर पडत किंवा घरातली एखादी व्यक्ती लवकर बाहेर पडून पुढे जात असे. याचं कारण म्हणजे तिकीट खिडकीसमोर लागलेली भलीमोठी रांग. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंधेरी, बोरिवली, वांद्रे अशा सगळ्याच मुख्य स्थानकांवर तिकिटांसाठी रांगेत दीड दीड तास उभे राहायला लागलेल्यांची संख्या आजही मुंबईत लाखोंच्या घरात असेल.
त्या वेळी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या तिकिटांची विक्री केवळ आणि केवळ तिकीट खिडक्यांवरूनच होत होती. रेल्वेचं तिकीट काढण्याचा दुसरा काहीच पर्याय नव्हता. त्यामुळे लोकांनाही रांगांमध्ये उभं राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्यात मग रांगेत उभं राहिल्यावर खिडकीपर्यंत पोहोचेस्तोवर रांगेतल्या इतर प्रवाशांशी बाचाबाची व्हायची. कधी एखादा चुकार माणूस रांगेत घुसायचा प्रयत्न करायचा, कधी कोणी स्वत: रांगेत उभं न राहता पुढल्या माणसाकडे पसे देऊन तिकीट काढायला सांगायचा, कधी धक्काबुक्की झाली म्हणू, पण भांडणं अपरिहार्य होती. खिडकीशी पोहोचल्यानंतर तिकीट देणारा कर्मचारी आणि प्रवासी अशी जुगलबंदी सुरू व्हायची.
या सगळ्या गोंधळात सीव्हीएम कूपन्स नावाचा प्रकार रेल्वेने सुरू केला आणि तिकीट खिडक्यांसमोर तिष्ठत बसलेल्या लाखो प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आपल्याला हव्या तेवढय़ा मूल्याची कूपन्स घेऊन त्यावर स्वहस्ते छापा मारला की, काम झाले. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच सोय झाली होती. पण रेल्वेने नुकताच सीव्हीएम कूपन्सचा पर्याय बंद केला. या कालावधीत रेल्वेच्या सेंटर फॉर इन्फम्रेशन सिस्टीमने म्हणजेच क्रिसने एटीव्हीएम (ऑटोमेटिक तिकीट व्हेंिडग मशीन) आणि जेटीबीएस (जनसाधारण तिकीट बुकिंग सिस्टीम) या दोन प्रणाली विकसित केल्या. स्वत:च स्मार्ट कार्ड विकत घेऊन त्यात आपल्याला हवी तेवढी रक्कम भरून कुटुंबातल्या कुणालाही वापरता येईल, अशा या कार्डने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांच्या जवळ, काही शहरांमध्ये स्थानकांपासून काही लांबच्या अंतरावर जेटीबीएस यंत्रणा सुरू करून प्रवाशांना त्यांच्या घराजवळच तिकीट मिळण्याची सोयही रेल्वेने केली. तर अगदी गेल्याच वर्षी रेल्वेने पेपरलेस मोबाइल तिकिटिंग सिस्टीम आणि कॅश अँड कॉइन ऑपरेटेड एटीव्हीएम या दोन प्रणालीही प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत.
आजघडीला उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना तिकीट खिडकी, एटीव्हीएम, जेटीबीएस, मोबाइल तिकीट आणि सीसीओ-एटीव्हीएम असे अनेक पर्याय तिकीट काढण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र आकडेवारीवर नजर टाकल्यास प्रवाशांची पसंती अद्यापही तिकीट खिडक्यांनाच असल्याचे दिसते. उपनगरीय रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांपकी ६५टक्के प्रवासी अजूनही तिकीट खिडकीसमोर रांग लावूनच तिकीट काढतात. एटीव्हीएम आणि जेटीबीएस या यंत्रणांचा वापर करून तिकीट मिळवणाऱ्या प्रवाशांची संख्या आजमितीला १७-१७ टक्के एवढी आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी रांगा लावण्याशिवाय पर्याय नाही. पण कोणत्याही रांगेत उभं न राहता आपल्या हातात आपल्याला हवं तेव्हा तिकीट देणाऱ्या मोबाइल तिकीट सेवेला असलेला प्रवाशांचा प्रतिसाद मात्र अत्यल्प म्हणजे ०.५ टक्के एवढाच आहे. सीसीओ-एटीव्हीएम वापरणाऱ्या प्रवाशांची संख्याही एवढीच आहे.
रेल्वेने एटीव्हीएम यंत्रे लोकप्रिय करण्यासाठी सुरुवातीपासूनच या यंत्रांवर पाच टक्के सवलत देऊ केली होती. त्यामुळे १०० रुपयांची रक्कम कार्डात भरल्यावर प्रत्यक्षात प्रवाशांना १०५ रुपये वापरण्यास मिळत होते. त्यामुळे एटीव्हीएम सेवा लोकप्रिय झाली. तरी, आजही एटीव्हीएमला मिळणारा प्रतिसाद हा मुख्यत्त्वे त्या यंत्रांजवळ उभे राहून प्रवाशांना तिकीट काढून देणाऱ्या समन्वयकांमुळे आहे. स्वत:चे कार्ड वापरून एटीव्हीएमवरून तिकीट काढणारे खूपच कमी लोक आहेत. तरीही मध्य तसेच पश्चिम रेल्वेने या यंत्राच्या प्रचारासाठी खूप प्रयत्न केले होते.
याउलट लोकांना वापरण्यास अत्यंत सोप्या अशा मोबाइल तिकीट सेवेचा प्रसार करण्यासाठी रेल्वेने काहीच प्रयत्न केलेले नाहीत. प्रवाशांना या सेवेची माहिती देण्यासाठी उद्घोषणा, छोटय़ा छोटय़ा जाहिराती, पथनाटय़ आदी गोष्टी करणे गरजेचे होते. विशेष म्हणजे मोबाइल तिकीट सेवेचे उद्घाटन करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली होती. पण मध्य तसेच पश्चिम रेल्वेने तसे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मध्य रेल्वेच्या कला व सांस्कृतिक विभागाने मोबाइल तिकीट सेवेच्या प्रसारासाठी एक ऑडिओ स्वरूपातील जाहिरात तयार केली होती. मात्र ती जाहिरात अद्याप एकदाही वाजलेली नाही. मोबाइल तिकीट प्रणाली प्रवाशांना वापरण्यास किचकट असल्याची टीका रेल्वेतीलच काही अधिकारी करतात. तर रेल्वेच्या तिकीट तपासनीसांना अद्यापही या सेवेबाबत माहिती नाही.
आता रेल्वेने फास्ट तिकीट नावाची संकल्पना अमलात आणण्याचे ठरवले आहे. क्रिसने त्यासाठी सध्याच्या एटीव्हीएममध्येच प्रवाशांना तात्काळ तिकिटासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. त्यात त्या त्या स्थानकावरून जास्तीत जास्त विकल्या जाणाऱ्या २० स्थानकांची नावे असतील. त्यापकी आपल्याला पाहिजे त्या स्थानकावर क्लिक केले की, त्या स्थानकापर्यंतचे तिकीट प्राप्त होणार आहे. क्रिसने ही यंत्रणा हॉट की एटीव्हीएमला पर्याय म्हणून तयार केली आहे. हॉट की एटीव्हीएमसाठी रेल्वेतील काही अधिकारी प्रयत्नशील होते. आता हॉट की एटीव्हीएमच्या ऐवजी येणाऱ्या या प्रणालीचा प्रचार करण्यात रेल्वेने हात आखडता घेतला, तर रेल्वेच्या तिकीट खिडक्यांपुढील रांगा कधीच संपणार नाहीत.
रोहन टिल्लू